भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा सवाल : चाकरमान्यांची मोफत कोविड टेस्ट, प्रवासाची सोय करणे गरजेचे! : परप्रांतीय कामगारांना एक न्याय अन् चाकरमान्यांना दुसरा का?
वार्ताहर / मालवण:
कोरोना कालावधीत राज्य शासनाने मुंबईतील परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मोफत जाण्याची व्यवस्था केली होती. त्याच पद्धतीने गणेशोत्सव कालावधीत मुंबईहून कोकणात येणाऱया चाकरमान्यांची मोफत कोविड टेस्ट व मोफत प्रवासाची व्यवस्था करावी. ज्या चाकरमान्यांच्या जीवावर शिवसेनेची मुंबईत व राज्यात सत्ता आहे, त्या चाकरमान्यांसाठी शिवसेना मोफत कोविड टेस्ट व प्रवासाची सोय शिवसेना करू शकत नाही का? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भाजप कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, बाबा परब, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.
राजन तेली म्हणाले, जिल्हा प्रशासन व सत्ताधारी यांच्यात कोरोना कालावधीत कोणताही ताळमेळ नाही. जिल्हा प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी मनाला येतील, तसे निर्णय घेत सुटले आहेत. भाजप पदाधिकाऱयांनी वारंवार निवेदन दिल्यावरच जिल्हा प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी बैठका घेतल्या. या बैठकांमध्येही कोणताही ताळमेळ नव्हता.
आरोग्य विभागातील रिक्त पदे भरा
तेली म्हणाले, कोरोना काळात जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद यामधील 534 पदे त्वरित भरणे गरजेचे आहे. ही पदे चतुर्थीपूर्वी शासनाने भरावीत. रिक्त पदे चतुर्थीपूर्वी भरणे शक्य नसल्यास तेथे कंत्राटी पद्धतीने तरी भरती करावीत. जेणेकरून जिल्हय़ात जनतेच्या आरोग्याची कोणतीही हेळसांड होणार नाही.
अन्यायकारक शासन परिपत्रक रद्द करा!
तेली म्हणाले, शासनाने 11 जुलै रोजी सार्वजनिक गणेशोत्सव (घरगुती गणेशोत्सवासह) 2020 मार्गदर्शक सूचनांचे जे परिपत्रक जाहीर केले होते, ते कोकणातील गणेशोत्सवाच्या परंपरेचा कोणताही विचार न करता केलेले आहे. सध्या कोकणातील गणशे मूर्ती पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे दोन व चार फुटांच्या मूर्ती बनविण्याचे परिपत्रक आता अचडणीचे होणार आहे. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करण्यात यावे.
‘त्या’ निर्णयासंबंधी न्यायालयात दाद मागणार
तेली म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाच हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. परंतु हे प्रशासक नेमताना ते जिल्हय़ाच्या पालकमंत्र्यांना दाखवूनच नेमावेत, असा फतवा राज्य शासनाने काढला आहे. या फतव्यामुळे जिल्हय़ातील पालकमंत्री राजकीय हस्तक्षेप करणार आहेत. प्रशासकांवर सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा दबाव असणार आहे. याबाबत आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांनी या अन्यायकारक आदेशाबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.
केसरकर राजकीय आजाराने त्रस्त!
शिवसेना आमदार दीपक केसरकर आजारपणामुळे जिल्हय़ात येत नसल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगितले जात आहे. मात्र, मुंबईतील काही बैठकांना त्यांची उपस्थिती दिसत आहे. केसरकरांना शारीरिक आजाराने नव्हे, तर राजकीय आजाराने त्रस्त आहेत व त्यांचा आजार शिवसेनाच वाढवत आहे, असेही तेली म्हणाले.









