गणेशोत्सवाला येणाऱया चाकरमान्यांच्या दृष्टीने सरकारने घेतलेल्या निर्णयांचे ‘टायमिंग’ चुकल्याने ते ‘वरातीमागून घोडेच’ ठरले. गणेशोत्सवाला येतानाचा प्रवास खडतर झाला असला तरी चाकरमान्यांच्या परतीची वाट तरी ती सुखकर व्हावी हीच आता अपेक्षा आहे.
गणेशोत्सवाला येणाऱया चाकरमान्यांच्या दृष्टीने सरकारने घेतलेल्या निर्णयांचे ‘टायमिंग’ चुकल्याने ते ‘वरातीमागून घोडेच’ ठरले. उशिरापर्यंत सरकारचा निर्णयच येत नसल्याने चाकरमान्यांनी खासगी वाहनांनी गावचा रस्ता धरल्याने नंतर सोडलेल्या एस. टी. बसेस, रेल्वे गाडय़ा कधी नव्हे त्या कोकणात रिकाम्याच धावल्या. चाकरमानी घरी पोहचल्यावर टोलमाफीचा निर्णय घेतला गेला. गणेशोत्सवाला येतानाचा प्रवास खडतर झाला असला तरी चाकरमान्यांच्या परतीची वाट तरी ती सुखकर व्हावी हीच आता अपेक्षा आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण. दरवर्षी लाखो चाकरमानी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिह्यात गणेशोत्सवासाठी दाखल होतात. त्यासाठी दोन-तीन महिने अगोदरच तयारी सुरू असते. गणेशोत्सव स्पेशल गाडय़ा जाहीर होताच पहिल्याच दिवशी बुकिंग फुल्ल होते. हीच परिस्थिती एसटीच्या बाबतीतही असते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे परिस्थितीच बदलून गेलेली आहे. चाकरमानी घरी पोहचल्यानंतर एसटी. बसेस, रेल्वे गाडय़ा सोडल्याने त्या रिकाम्याच धावल्या. त्यामुळे कोकणवासियांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नही फसला व शासनाचा महसूलही हातचा गेला. एस.टी. बसेस, रेल्वे रिकाम्या धावल्या. चाकरमान्यांना कोकणात पाठवण्याबाबत निर्णय योग्यवेळी झाला नाही हेच यामागचे खरे कारण ठरले. गणपतीला गावाला यायचे म्हणून कोकणातला माणूस आधीच आपल्या नोकरीच्या ठिकाणी सुट्टीचा अर्ज देऊन ठेवतो. दोन-दोन महिन्यांपासून तयारी करतो, पण यंदा शासनामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. वेळेत निर्णय झाला नाही. किती दिवस क्वारंटाईन करायचे, यावरून गोंधळ झाला. त्या-त्या जिह्यातील जिल्हाधिकाऱयांनी आपापल्यापरीने क्वारंटाईन कालावधी जाहीर केला. अगदी शेवटी शेवटी राज्यशासनाने दहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी जाहीर केला. निर्णय घ्यायचा होता तर तो वेळेत द्यायला हवा होता, पण तसे झाले नाही. शिवाय सरकारने दहा दिवसांचा क्वारंटाईनचा निर्णय घेतला असला तरी त्याच्या लेखी सूचना ग्राम पंचायत स्तरावर गेलेल्याच नसल्याने चाकरमान्यांना चौदा दिवस घरीच रहावे लागले.
लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या कालावधी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये चार लाखाहून अधिक चाकरमानी यापूर्वीच दाखल झालेले आहे. जे कुणी राहिले होते ते गणेशोत्सवाची वाट पहात बसले होते. मात्र सरकारने योग्यवेळी निर्णय न घेतल्याने त्यांनीही खासगी वाहनानी गावचा रस्ता धरला. मात्र पावलोपावली त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. निसर्ग कोपल्यागत मुसळधार पावसाने गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांच्या वाटा अर्ध्यावरच काही तास रोखून धरल्या. चाकरमान्यांच्या कोकणात घेण्याबाबतचा निर्णय अगदी उशिरा झाला असतानाच दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेने मुंबईत परतणाऱयांसाठी चौदा दिवसांचा विलगीकरण कालावधी जाहीर केला. म्हणजे कोकणात येऊन दहा दिवस क्वारंटाईन रहायचे, गणपतीचे सहा दिवस आणि पुन्हा मुंबईत जाऊन चौदा दिवस क्वारंटाईन, शिवाय प्रवासाचे दोन दिवस म्हणजे महिन्याहून अधिक दिवस घरी बसायचे. या प्रकारानेच यावर्षी गणेशोत्सवात येणाऱया चाकरमान्यांमध्ये निरुत्साह पसरल्याचे दिसते. दरवर्षी गणेशोत्सवाला लाखो चाकरमानी कोकणात येतात. यावर्षी कोरोना संसर्ग असतानाही वेळीच सरकारी नियोजन झाले असते तर त्यांचा ओघ वाढलाच असता. मात्र तसे झालेले नाही. आतापर्यंत दोन्ही जिल्हय़ात जेमतेम लाखभर चाकरमानी दाखल झाले आहेत. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींचे वेगवेगळे नियम असल्याने आलेल्या चाकरमान्यांनाही त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. उत्सवात एकत्रित आरत्या करायच्या नाहीत, भजन करायचे नाही हे सगळे नियम चाकरमान्यांना अमान्य आहेत. मुंबईतून अडथळय़ांची शर्यत पार करून गावाला जायचे म्हटले तर तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. रुग्णसंख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. त्यामुळे संसर्गाची धास्ती असतानाच कोरोनो चाचणी करा, गावाला जा, क्वारंटाईन व्हा, आरती भजनापासून अलिप्त रहा अशा कारणांमुळे यावर्षी गावचा बाप्पा नकोच असे म्हणत असंख्य चाकरमानी जाग्यावरच थांबले आहेत.
शिवसेनेचे मूळ हे कोकणात आहे. कोकणाने आजवर शिवसेनेला ताकद दिली. मुख्यमंत्री शिवसेनेचे, रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे. परिवहन मंत्री तेच आहेत. दोन्ही जिह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहेत. मात्र तरीही चाकरमान्यांनाबाबत योग्यवेळी निर्णय झाला नाही. मुंबईतील अनेक चाकरमान्यांच्या मंडळानी शासनाला पत्रे दिली होती. वेळीच निर्णय घ्या, हे वारंवार सांगितले. मात्र त्याबाबतीत काहीच घडले नाही. एकंदरीत चाकरमान्यांमध्ये संताप आणि नाराजीची भावना आहे. गावपातळीवरील मतदानात चाकरमानी हाच महत्त्वाचा केंद्रबिंदू असल्याने साहजिकच राजकीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी त्यांच्यासाठी पुढे सरसावले. अगदी गावपातळीवर विरोध असतानाही. कोरोना लॉकडाऊनमध्ये चाकरमान्यांना गावी आणण्यावरून मोठे राजकारण रंगले, त्यातून श्रेयवादही पुढे आला. मात्र गणेशोत्सवात सरकारच्या फसलेल्या निर्णयावरून लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांवरही पाणी फेरले आहे. संतापलेल्या मुंबईकरांमुळे येणाऱया मुंबई महानगरपालिकासह स्थानिक पातळीवरील निवडणुकात मुंबईकर काय करेल याचा अंदाज असल्यानेच शिवसेना नेतेमंडळींच्या पोटातही भीतीचा गोळा आला आहे. त्यामुळे उत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल त्यावेळी त्यांची पाठवणी सुरळीत व्हावी हीच कोकणवासियांची अपेक्षा आहे.
राजेंद्र शिंदे








