प्रतिनिधी/खेड, चिपळूण
पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमान्यांनी बुधवारपासून परतीची वाट धरली आहे. याचमुळे रेल्वेस्थानकासह बसस्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी उसळली आहे. गर्दीवर नियंत्रणात आणताना पोलीस यंत्रणेसह रेल्वेच्या विशेष कृती दलाची दमछाक होत आहे. महामार्गही वाहनांच्या रेलचेलीने पुरता गजबजला आहे. मोक्याच्या ठिकाणी पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांना आता मुंबई गाठण्याचीच चिंता लागली आहे. बुधवारपासून रेल्वेस्थानकामध्ये चाकरमान्यांची प्रचंड गर्दी उसळली. हीच परिस्थिती येथील बसस्थानकातही दिसून आली. मुंबईला सोडलेल्या जादा बसफेऱयांमुळे येथील बसस्थानकात बसेसनी पुरते पॅक झाले. बसस्थानकात प्रवाशांची गर्दी उसळल्याने नियोजित बसेसची माहिती प्रवाशांना मिळावी, यासाठी बसस्थानकात मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांची दिवस-रात्र डय़ुटी
भरणेनाका येथे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून पोलीस कर्मचाऱयांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे. वाहनांची वाढलेली वर्दळ अन् प्रवाशांच्या रेलचेलीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी पोलीस दिवस-रात्र डय़ुटी बजावत आहे. कशेडी टॅपवरही वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
परतीसाठीच्या 10 गणपती स्पेशल आजपासून
गणरायाला निरोप दिल्यानंतर रेल्वेगाडय़ांना चाकरमान्यांची उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी आणखी 10 गणपती स्पेशल जाहीर केल्या आहेत. या गणपती स्पेशल 16 सप्टेंबरपासून धावणार असल्याने गणेशभक्तांच्या अडथळय़ांच्या शर्यतीला ब्रेक लागणार आहे. मडगाव-पनवेल, पनवेल-रत्नागिरी, पनवेल-कुडाळ, पनवेल-रत्नागिरी, मडगाव-पनवेल स्पेशलचा समावेश आहे. तर मडगाव-उधना सुपरफास्ट स्पेशल 20 सप्टेंबरला धावणार आहे.
चिपळूण आगार प्रवाशांनी ‘फुल्ल’
पाच दिवसाच्या गणेश विसर्जनानंतर बहुसंख्येने दाखल झालेले चाकरमानी पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघाल्याने चिपळूण आगार प्रवाशांनी हाऊसफुल्ल झाले आहे. आगारातून 2 दिवसांत तब्बल 126 बसगाडय़ा रवाना झाल्याने चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी आगार प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.
गणेशोत्सवासाठी बहुसंख्येने चाकरमानी गावाला आले होते. बहुतांशी ठिकाणी घरगुती गणेशोत्सव 5 दिवसांचा असल्याने या विसर्जनानंतर चाकरमानी पुन्हा परतीचा प्रवासासाठी निघाले आहेत. यामुळे चिपळूण आगाराने जादा गाडय़ांचे नियोजन केले आहे. मंगळवारपासून प्रारंभ झालेल्या परतीच्या प्रवासासाठी आगाराने 34 बसगाडय़ा मुंबई मार्गावर रवाना झाल्या. बुधवारी परतीच्या प्रवाशांची प्रवासी संख्या वाढल्याने बसस्थानक हाऊसफुल्ल झाले होते. परतीच्या प्रवासादरम्यान चाकरमान्याची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारात स्वतंत्र जादा वाहतूक केंद्राची उभारणी केली होती. एकीकडे चाकरमान्यांसाठी जादा बसगाडय़ाचे नियोजन आगार प्रशासनाकडून करण्यात आले असले तरी दुसरीकडे ग्रामीण फेऱयाचे वेळापत्रक कोलडमडले होते. मंगळवारी आगाराने चाकरमान्यांसाठी 34 तर बुधवारी 92 नियमितसह जादा बसगाडय़ा सोडल्या.









