सबळ पुरावे हाती लागल्याचा दावा : ‘आयआयआरएस’कडून डेटा प्राप्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताची बहुचर्चित मोहीम ‘चांद्रयान-2’ने चंद्रावर पाण्याच्या रेणूंची उपस्थिती शोधली आहे. मोहिमेदरम्यान मिळालेल्या माहिती-आकडेवारीवरून पाण्यासंबंधीचे संशोधन उघड झाले आहे. ‘चांद्रयान-2’वरील उपकरणामध्ये ‘इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर’ (आयआयआरएस) नावाचे एक उपकरण असून ते वैश्विक शास्त्रज्ञ डेटा मिळवण्यासाठी 100 किमीच्या ध्रुवीय कक्षेत काम करत आहे. यातून पाण्याच्या अस्तित्वाबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे.
माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांच्या मदतीने लिहिलेल्या एका शोधनिबंधात यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. ‘करंट सायन्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखामध्ये याबाबतची सविस्तर माहिती नमूद केलेली दिसते. ‘चांद्रयान-2’ने अपेक्षित परिणाम मिळवले नसले तरी पाण्याशी संबंधित सापडलेले हे धागेदोरे भविष्यकालीन वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
भारताने 22 जुलै 2019 रोजी चंद्रावर स्वारी करणारी ‘चांद्रयान-2’ मोहीम राबवली होती. तथापि, त्यामधील लँडर ‘विक्रम’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात त्याच वषी 7 सप्टेंबर रोजी ठरवल्याप्रमाणे ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्यात यशस्वी ठरला नव्हता. या अयशस्वीतेनंतर पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर उतरण्याचा बहुमान पटकवण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नव्हते. ‘चांद्रयान-2’च्या लँडरमध्ये ‘प्रज्ञान’ नावाचा रोव्हरही होता. मिशनचे ऑर्बिटर अजूनही चांगले काम करत असून ते देशातील पहिल्या चंद्र मिशन ‘चांद्रयान-1’ला डेटा पाठवत आहे. याच माध्यमातून चंद्रावर पाणी असल्यासंबंधीचे पुरावे पाठवले आहेत.








