राम मंदिर उभारणीसाठी दान- 400 किलोच्या चांदीच्या विटा प्राप्त
वृत्तसंस्था / लखनौ
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भगवान रामाच्या मंदिरासाठी भाविक मोठय़ा संख्येत चांदीच्या विटा दान करत आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे चांदीच्या विटांचा ढीग निर्माण झाला आहे. ट्रस्टला आतापर्यंत 400 किलो वजनाच्या चांदीच्या विटा प्राप्त झाल्या आहेत. ट्रस्टने रामभक्तांना आता यापुढे चांदीच्या विटा दान न करण्याचे आवाहन केले आहे, कारण बँक लॉकर्समध्ये त्यांना ठेवण्याची जागाच शिल्लक राहिलेली नाही.
राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून लोक चांदीच्या विटा पाठवत आहेत. चांदीच्या विटा मोठय़ा प्रमाणात आल्याने त्यांना सुरक्षित ठेवण्याची समस्या उभी ठाकली आहे. याचमुळे ट्रस्टने आता चांदीच्या विटा दान न करण्याचे आवाहन केले आहे. आमचे सर्व बँक लॉकर्स चांदीच्या विटांनी भरले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी दिली आहे.
सुरक्षेत मोठा खर्च
ट्रस्ट रामभक्तांच्या भावनांचा आदर करतो, पण आता दानाच्या स्वरुपात चांदीच्या विटा पाठवू नयेत. या चांदीच्या विटांना सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे. राम मंदिर उभारणीसाठी चांदीच्या विटांची गरज भासल्यास भाविकांना पुन्हा या स्वरुपातील दान करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे डॉ. मिश्र म्हणाले.
1600 कोटींपेक्षा अधिक देणगी प्राप्त
राम मंदिर ट्रस्टच्या सूत्रांनुसार मंदिर उभारणीसाठी देशभरातून आतापर्यंत 1600 कोटी रुपयांपेक्षा अधिकची देणगी प्राप्त झाली आहे. ट्रस्टकडून निर्माण करण्यात आलेले अनेक समूह मोहीम राबवून प्रत्येक घरातून देणगी प्राप्त करत आहेत. लोकांकडून धनादेश आणि ऑनलाईन माध्यमातूनही देणगी स्वीकारण्यात येत आहे. देणगी अभियानात सुमारे 1 लाख 50 हजार जण कार्यरत आहेत. 39 महिन्यांच्या आत राम मंदिर उभारले जाण्याची शक्यता असल्याचे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी म्हटले होते.









