बाळासाहेब उबाळे/कोल्हापूर
ज्यावेळी वातावरण चांगले असते, त्यावेळीच महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. सेव्ह लाईफ या संस्थेने एनएच 48, पुणे-सातारा-कागल महामार्गावर केलेल्या सर्व्हेतून ही अत्यंत महत्वपूर्ण आणि जाग आणणारी बाब समोर आली आहे. यामुळे हा कॉरिडॉर शून्य मृत्यू कॉरिडॉर करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु झाले आहेत.
देशात जितके रस्त्यांचे जाळे आहे त्याच्या केवळ दोन टक्केच राष्ट्रीय महामार्ग ( एन.एच) आहेत. पण या दोन टक्के महामार्गावर मृत्यूचे प्रमाण मात्र 35 टक्के आहे. महामार्गावर होणाऱया या अपघाताची कारणे सुध्दा विचित्र आहेत. बहुतांश अपघात रात्री 12 ते पहाटे 6 या वेळेत होतात असा सर्व्हे आहे. पाऊस, खराब वातावरणात अपघातांचे प्रमाण कमी आहे. याउलट वातावरण चांगले असताना अपघात वाढले आहेत. वातावरण खराब किंवा नैसर्गिक आपत्ती असते, त्यावेळी वाहन चालकांकडून सावधगिरी बाळगून वाहन चालवले जाते. पण ज्यावेळी वातावरण चांगले असते त्यावेळी वाहनाचा वेग वाढलेला असतो. तसेच अशावेळी दाखवलेला फाजील आत्मविश्वास नडतो. या कारणांमुळे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. याबरोबरच अतिवेग, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, अचानक लेन बदलणे, इंडिकेटर्स, हेडलाईट सुस्थितीत नसणे ही कारणेही आहेत.
मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि सेव्ह लाईफ संस्था यांच्यामध्ये महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी करार झाला आहे. त्याप्रमाणे पुणे-सातारा-कागल या महामार्गावर प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवण्यात येत आहे. या माध्यमातून हा कॉरिडॉर शून्य मृत्Îू कॉरिडॉर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शून्य मृत्यू कॉरिडॉरसाठी 4 ई तंत्राचा वापर-
अभियांत्रिकी -रस्त्यांचा दर्जा व बांधणी चांगली करणे, आवश्यक ठिकाणी पूल, फ्लाय ओव्हर उभारणे
अंमलबजावणी–महामार्गावर वेगाने जाणाऱया वाहनांवर नियंत्रण ठेवणे, आरटीओ आणि पोलीसांकडून महामार्गावर 24 तास गस्त घालणे आणि आवश्यक त्या उपाययोजना करणे.
आपत्कालीन प्रतिसाद– महामार्गावर हॉस्पिटल , ट्रॉमा केअर सेंटर, रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे,अपघातातील रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी खासगी हॉस्पिटल बरोबर टायअप करणे
साक्षरता (शिक्षण) – रस्ते सुरक्षसंदर्भात जनजागृती, पेट्रोल पंप, हॉटेल्स, धाबे याठिकाणी जनजागृतीचे फलक व चित्रफिती दाखवणे, पंक्चरच्या दुकानातील कर्मचाऱयांना प्राथमिक आपत्कालीन प्रशिक्षण देणे
एनएच 48 होणार शून्य मृत्यू कॉरिडॉर –
महामार्गावरील बहुतांश अपघात रात्रीच्या वेळी झाले आहेत. अपघात होऊ नयेत यासाठी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि सेव्ह लाईफ या संस्थेच्या वतीने पुणे-सातारा-कागल या महामार्गावर प्रायोगिक तत्वावर काम करण्यात येत आहे. परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नजीकच्या काळात हा महामार्ग शून्य मृत्Îू कॉरिडॉर होईल .- प्रसाद गाजरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी









