हजारो भाविकांची उपस्थिती : अश्व प्रदक्षिणा ,विविध कार्यक्रमांचे आयोजन
वार्ताहर / बेडकिहाळ
चिकोडी-बेडकिहाळ मार्गावरील नेज ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागझरी येथील प्रसिद्ध जागृत दैवत श्री. चंद्रव्वाताई देवीची वार्षिक यात्रा मंगळवार 16 ते शनिवार ता 20 फेब्रुवारी अखेर विविध धार्मिक कार्यक्रम, शर्यती, जंगी निकाली कुस्त्या व महाप्रसादाने साजरी होत आहे. यात्रेनिमित्त बुधवार ता-17 रोजी देवीचा महारथोत्सव सोहळा विविध वाद्यांच्या गजरात भक्तिमय वातावरणात पार पडला.
मंगळवार ता 16 रोजी दुपारी 2 वाजता देवीस अभिषेक व पालखी मिरवणुकीने यात्रेला सुरवात झाली. बुधवार ता 17 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. या दिवशी सकाळी देवीची महापूजा, अभिषेक, कार्यक्रम झाला. यावेळी देवदासीच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा पार पडला. दिवसभर शेकडो भाविकांनी नैवद्य दाखवून देविचरणी प्रार्थना करून नवस केले. सायंकाळी 4 वाजता सिद्धाप्पा हणबर व परिवार यांच्या वतीने रथोत्सव महापूजा, मानपान, करून महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिर मिरवणूक मंदिर परिसरात काढण्यात आली.
यावेळी धनगरी ढोल, बेंजोच्या गजरात सायंकाळी 5 वाजता महारथोत्सवाला सुरुवात झाली. रथ ओढण्यासाठी कर्नाटक – महाराष्ट्रातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरापासून ते कुस्ती मैदानाजवळील पादुकापर्यंत रथ ओढण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी भंडारा, खोबरे, खारीकची उधळण करून चंद्रव्वाताईच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला. सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. रात्री 10 वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला.
18 रोजी रात्री 8 वाजता देवीस पाळण्यात घालणे व तुलाभार सोहळा पार पडला. रात्री 10 वाजता ‘दत्तकपुत्र’ हा कौटुंबिक नाटकचा प्रयोग झाला. यात्रा काळात नागराळ, काडापूर, उगार, येथील देवदाशींकडून गीत-गायनाचा कार्यक्रम पार पडत आहे.
19 रोजी सकाळी 9 वाजत चिकोडी- शिरगांव मार्गावर विविध भव्य शर्यती होणार आहेत. रात्री 10 वाजता कौटुंबिक नाटकाचा प्रयोग होणार आहे.