प्रतिनिधी/ बेळगाव
चक्हाट गल्ली मराठी शाळेच्या जागेची विक्री झाल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. या तक्रारीत तथ्य असल्याचे चौकशीदरम्यान निदर्शनास आल्याने महापालिका कार्यालयात खळबळ माजली आहे. सदर खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली. या प्रकरणी दोषी अधिकाऱयांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
यापूर्वी जागेचा ताबा घेण्यास आल्यामुळे महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन कारवाई थांबविली होती. मात्र, आता जागेची परस्पर विक्री झाल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका कार्यालयात खळबळ माजली असून खरेदी-विक्री व्यवहार रद्द करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सदर जागेची विक्री झाल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यामुळे याची माहिती घेण्यासाठी महसूल अधिकारी परशुराम मेत्री आणि साहाय्यक अभियंत्या मंजुश्री एम. यांची नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी उपनोंदणी कार्यालयात आणि एडीएलआर कार्यालयात जावून माहिती घेतली असता वटमुखत्यारपत्राद्वारे जागेची विक्री करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. सदर जागा हुक्केरी येथील जयगौडा शिवगौडा पाटील यांना विक्री करण्यात आली असल्याची माहिती उजेडात आली आहे. मात्र खरेदीदाराचे नाव सीटी सर्व्हे कार्यालयात नोंद झाले नसल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.
सदर जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने जागेबाबत सर्व फेरफार स्थगित आहेत. न्यायालयात वाद सुरू असल्याबाबतचे पत्र त्यावेळी एडीएलआर कार्यालयाला दिले होते. पण याची नोंद उताऱयामध्ये झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, सदर जागेचा व्यवहार झाल्याने तो रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. व्यवहाराची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली. या प्रकरणी दुर्लक्ष आणि निष्काळजी केलेल्या अधिकाऱयांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
यामुळे चव्हाट गल्ली शाळेच्या जागेचा झालेला खरेदी व्यवहार रद्द करण्यासाठी मनपा प्रशासनाला आता न्यायालयाचे दार ठोठावावे लागणार आहे. सदर वाद दिवसेंदिवस किचकट होत चालला असून याला कोण जबाबदार असा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण करण्याची जबाबदारी अधिकाऱयांची आहे. मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱयांच्या निष्काळजीपणामुळे मनपाच्या मालकीच्या जागांवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.









