वाहनधारकांना अडचणी : रस्त्याशेजारी लावलेल्या नियमबाहय़ वाहनांमुळे ये-जा करणे कठीण
प्रतिनिधी /बेळगाव
वाढती वाहने, अस्ताव्यस्त पार्किंग, रस्त्यात टाकलेले बांधकामाचे साहित्य, रस्त्यातच लावलेली वाहने यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुख्य बाजारपेठेसह इतर लहान गल्लीतूनदेखील होणाऱया वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अरुंद असलेल्या चव्हाट गल्लीत वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांसमोर अडचणी वाढत आहेत.
चव्हाट गल्लीत मंगल कार्यालय, कोर्टाची कामे आणि इतर आस्थापणामुळे नागरिकांची ये-जा असते. शिवाय कोर्टातून बाजारात जाणाऱया वाहनांची संख्याही अधिक आहे. दरम्यान, गल्लीत रस्त्यावर लावलेली वाहने आणि रस्त्यातच ठेवलेले बांधकामाचे साहित्य यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच ठरत आहे.
अस्ताव्यस्त वाहनामुळे अडचण
शहरातील मुख्य बाजारापेठेसह इतर ठिकाणी वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच रस्त्यावर लावलेल्या अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजत आहेत. रस्त्याशेजारी लावलेल्या नियमबाहय़ वाहनांमुळे ये-जा करणे कठीण होत आहे. त्यातच बांधकामसाठी लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जात आहे. शिवाय प्रवाशांसाठी रस्त्यातच थांबलेल्या रिक्षांमुळे वाहतूक केंडीत भर पडत आहे.









