पावसाळा आणि गरमागरम भजी यांचं अतूट नातं आहे. बाहेर पाऊस भुरभुरू लागला की घरात भजी तळली जातात. मात्र सतत भजी खाऊन कंटाळा येतो. भज्यांऐवजी काहीतर वेगळं आणि टेस्टी खायचं असेल तर टेस्टी कॉर्न चीज बॉल्स ट्राय करायला हरकत नाही.
साहित्य- चीजसाठी : एक वाटी मोजरेला चीज, पाव वाटी स्वीट कॉर्न वाफवलेले, दोन उकडून मॅश केलेले बटाटे, एक चमचा आरारुट, अर्धा चमचा चाट मसाला, काळी मिरी पावडर, चवीपुरतं मीठ
इतर साहित्य : अर्धी वाटी आरारुट, तीन चमचे मैदापेस्ट, एक वाटी ब्रेड क्रम्ब्स, तळण्यासाठी तेल.
कृती- चीजसाठी : सगळ्यात आधी चीज बनवण्यासाठीचं साहित्य एकत्र करावं. यातील काही भाग घेऊन गोळा करून घ्यावा. त्याला आरारुटनी कोटींग करावं. त्यानंतर हा गोळा मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवावा. त्यानंतर ब्रेड क्रम्ब्सनी कोटींग करावं. सर्व गोळे अशाच प्रकारे बनवून घ्यावेत. त्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावेत. कढईत तेल गरम करून घ्यावं. त्यात चीज बॉल्स टाकावेत. मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. बॉल्समधून जास्तीचं तेल बाहेर काढण्यासाठी टिश्यु पेपरने टिपून घ्यावेत. सॉससोबत सर्व्ह करावेत.









