खासदार धैर्यशील माने यांचे प्रतिपादन : कणबर्गी येथे पार पडली म. ए. समितीची बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
सीमावासियांची लढाई ही कोणत्या एका सरकारशी नसून ती अस्तित्वाची आहे. सीमा चळवळ यापुढेही सुरू ठेवायची असेल तर ही निवडणूक जिंकावीच लागेल. सिंहाने प्रत्येक गावागावात आपली डरकाळी फोडली असून, हा आवाज लवकरच लोकसभेच्या सभागृहात घुमेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.
गुरुवारी मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी कणबर्गी येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.
देवेंद्र साहेब तुम्ही चुकलातच
शुभम शेळपेंच्या रुपाने सीमावासीय भगव्या ध्वजाखाली एकत्र येत आहेत. याचवेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंडलगा गावात येऊन प्रचारसभा घेत आहेत. पण याच हिंडलगा गावात सीमाप्रश्नासाठी 9 हुतात्मे झाले आहेत. परंतु तुम्हाला या हुतात्म्यांचा विसर पडला. तुम्ही सीमाभागात का आलात? आणि कोणासाठी? ज्यांनी मराठी भाषिकांवर अनन्वित अन्याय केले त्यांच्याच प्रचारसभेसाठी तुम्ही आलात. देवेंद्रजी तुम्ही चुकलात, तुम्हाला सीमावासीय माफ करणार नाहीत, अशा शब्दात खासदार धैर्यशील माने यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, बेळगावचा सीमालढा महिलांनी आपल्या हातात घेतला आहे. 65 वर्षांत झालेल्या अत्याचाराला उत्तर देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याच भागात मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी काही राष्ट्रीय पक्षांचे नेते आले आहेत. येणाऱया निवडणुकीतून त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी शुभम शेळके यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मदन बामणे यांच्यासह इतर नेते व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









