चिपी विमानतळ : रस्ते, वीज, पाण्याबाबत उशिराने जाग : लोकप्रतिनिधी, अधिकाऱयांची अनास्थाच
प्रतिनिधी / कुडाळ:
शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्यापासून चिपी-परुळे येथील विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राजकीय नेतृत्वाला विमानतळ ते मुंबई-गोवा महामार्ग जोडणाऱया महत्वाच्या मार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी तरतूद करण्याकरिता तसेच पाणी व वीज याबाबत अद्याप जागच आली नव्हती.
दोन वर्षांपूर्वी एअरपोर्ट ऍथॉरिटीने मुख्य रस्ता तातडीने बनवा, असे सांगूनही याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱयांनी दुर्लक्ष केला. आता या रस्त्यासाठी अंदाजपत्रकातील तरतुदीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांना विमानतळ सुरू व्हावा, असे मनापासून वाटते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व सुरेश प्रभू उडानमंत्री असल्यापासून चिपी विमानतळावरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विमानतळासाठी परवानगी मिळणे खूप अवघड काम असल्याचे लक्षात आल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करून समाधान मानण्यात आले. सुरेश प्रभू संबंधित खात्याचे मंत्री असूनही आवश्यक परवानग्या त्यावेळी मिळाल्या नाहीत. आता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाआघाडीचे सरकार आले. तेव्हापासून विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आय. आर. बी. ठेकेदार कंपनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गेले वर्षभर प्रयत्न करीत आहे. खासदार विनायक राऊत यांनी विमानतळासंदर्भात परवानग्या मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
मूलभूत सुविधांचा शासनाला विसर
विमानतळासाठी परवानगी केंद्र व संबंधित खात्याकडून मिळावी लागते. मात्र, त्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा राज्य शासनाने द्यायच्या असतात. रस्ता, पाणी, वीज व अन्य सर्व सुविधा राज्य शासनाने द्यायच्या आहेत. मात्र, शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींना एवढे दिवस याचा विसरच पडला होता. बैठका घ्यायच्या, चर्चा करायची, अधिकाऱयांना सूचना द्यायच्या. मग पुढे काहीच नाही, अशी परिस्थिती वर्षभर दिसून येत आहे. पाणी, वीज यासाठी बैठका घेताना कायमस्वरुपी सोय करणार, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे अधिकारी हे लोकप्रतिनिधींचे आदेश, सूचना गांभीर्याने घेत नाहीत, हे उघड झाले आहे.
विमानतळ मुख्य रस्त्यावर
रुपयाचीही तरतूद नाही
2018-19 मध्ये पिंगुळी-पाट या रस्त्यावर मंजूर झालेले चार किमी डांबरीकरण 2020 मध्ये करण्यात आले. तेही 50, 100 व 200 मी. असे तुकडे पाडून. आता विमानतळ सुरू होण्याची शक्यता गृहित धरून या रस्त्याचे रुंदीकरण व अन्य कामे हाती घेण्यासाठी तरतूद करणे आवश्यक होते. हा रस्ता 18 ते 22 मी. एवढा रुंद असून त्याचे अनेक वर्षांपासून भूसंपादन झाले आहे. रुंदीकरणाचा प्रस्ताव करून निधी उपलब्ध करून दिला असता, तर हा रस्ता नवीन भूसंपादनाशिवाय दुपदरी मोठा रस्ता आज तयारही झाला असता. मात्र, 2020-21 मध्ये या रस्त्यावर एकाही रुपयाची तरतूद केली नाही किंवा अधिकाऱयांनी प्रस्तावित केली नाही.
कुडाळ येथून परुळे येथे पाणी नेण्यासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी बैठक झाली. पण पुढे काहीच झाले नाही. सध्या अकरा केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा विमानतळाला झाला असून तो अपुरा आहे. 33 केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा आवश्यक असून गेली दोन वर्षे हा प्रश्न सोडविण्यात राजकीय नेत्यांना यश आले नाही. राज्य शासन पर्यायाने स्थानिक लोकप्रतिनिधी विमानतळासाठी मूलभूत सुविधा निर्माण करून देऊ शकले नाहीत, हे उघड सत्य नाकारता येत नाही. आताचे व पूर्वीचे सर्वच सत्ताधारी राजकीय नेते याला जबाबदार आहेत.
मुख्य रस्ता यावर्षीही होणे अवघड
कुडाळ-पिंगुळी-पाट-परुळे हा विमानतळ-हायवे जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यासाठी आता बजेटमधून तरतूद करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. फेब्रुवारी-मार्च दरम्यान पुरवणी बजेटमधून मंजुरी जरी मिळाली, तरी पुढील प्रक्रिया करून मे अखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होणे अवघड आहे. पावसाळय़ानंतरच हे काम हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई-परुळे अर्धा तास, कुडाळमध्ये पोहोचण्यास एक तास
विमानाने मुंबईहून परुळे विमानतळावर यायला अर्धा तास लागेल. पण विमानतळ ते कुडाळ हे अंतर कापायला चारचाकी वाहनांना एका तासाहून अधिक वेळ लागेल आणि तेही खड्डय़ांतून कसरत करीत यावे लागेल. त्यामुळे विमानतळ सुरूच झाला, तर रस्ता चांगला नसल्याने प्रवासी विमानाने यावे की नको, याबाबत विचार करतील.
पाट-माऊली मंदिराकडील पूल होणार रुंद
सागरी महामार्गावरील पाट-माऊली मंदिरानजीक असलेला जुना छोटा पूल मोठा होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी रविवारी पाट येथे थांबून या पुलाची पाहणी केली. मंदिराला कोणताही धोका न करता वरच्या बाजूने नवीन पूल बांधण्याचा तसेच संरक्षक भिंत बांधण्याबाबत चर्चा झाली. तशा सूचना संबंधित अधिकाऱयांना देऊन त्या कामाबाबत पुरवणी बजेटसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रस्त्याची प्रचंड दुरवस्था
पाट ते परुळे विमानतळ या दरम्यानच्या रस्त्याचे काम झाले आहे. पाट ते पिंगुळी-कुडाळ या सोळा किमी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. वाहने चालविणे धोक्याचे झाले आहे. या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात वाळूने भरलेल्या सुसाट डंपरची वाहतूक सुरू असते. त्यामुळे भरलेल्या खड्डय़ांवर एक डांबरीकरणाचा थर (कार्पेट) टाकला नाही, तर ते खड्डे पंधरा दिवसांत उखडतील. साहजिकच रस्ता वाहतुकीस योग्य ठरणार नाही.









