ऑनलाईन टीम / चंदीगढ :
चमकौर साहिबचे आमदार चरणजीतसिंग चन्नी सकाळी 11 वाजता पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ते राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री असतील. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर रविवारी नवीन मुख्यमंत्री म्हणून चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कॅप्टनच्या मंत्रिमंडळात चन्नी हे तंत्रशिक्षण मंत्री होते पण आता ते संपूर्ण राज्याची सूत्रे हाती घेतील. दरम्यान, थोडय़ाच वेळात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी सायंकाळी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांना आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. दरम्यान, चरणजीत सिंग हे दलित शिख समाजातील आहेत. अमरिंदर सिंग कॅप्टन यांच्या सरकारमध्ये ते तंत्रशिक्षण मंत्री होते. रुपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत.









