3 मसाला डोसा, आम्लेट
सुपरनोव्हाजची महिला फलंदाज चमारी अटापटू हिने शनिवारी सामना जिंकून देणारी खेळी तर साकारलीच. शिवाय, आपल्या संघाचे अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले. या लढतीनंतर तिने आपल्या पॉवरहिटिंग फलंदाजीचे रहस्य उलगडले आणि ते म्हणजे या लढतीसाठी फलंदाजीला उतरताना तिच्या आहारात होते 3 मसाला डोसा व 1 आम्लेट!
आयपीएल स्पर्धेचा एक भाग असलेल्या महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत सुपरनोव्हाज संघाने प्रतिस्पर्धी ट्रेलब्लेझर्सवर 2 धावांनी निसटता विजय संपादन केला. शारजाहमध्ये ही लढत खेळवली गेली.
सुपरनोव्हाजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर चमारी अटापटू व प्रिया पुनिया यांनी येथे पहिल्या 6 षटकातच 50 धावांची भागीदारी फलकावर लावली होती. या उभयतांनी 89 धावांची सलामी दिली आणि त्यात चमारीचा एकटीचा वाटा अधिक ठरला. तिने 48 चेंडूतच 67 धावांची आतषबाजी केली.
या लढतीबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘3 मसाला डोसा आणि मसाला आम्लेट हे माझ्या पॉवरहिटिंगचे रहस्य. शकीरा सेलमन, जेमिमा रॉड्रिग्ज व हरमनप्रीत कौर यांचा वाटाही महत्त्वाचा राहिला’.









