‘त्या’ प्ररप्रांतीय कामगारांसाठी मागणीनुसार भोजन पुरवठा
बेळगाव / प्रतिनिधी
बेंगळूरहून राजस्थानला निघालेल्या परप्रांतिय कामगारांना बेळगाव जिल्हा प्रशासनाने समाज कल्याण खात्याच्या वसतीगृहात बंदिस्त ठेवले आहे. कोणतीच सुविधा नको, फक्त गावाला पाठवा, अशी मागणी केली होती. पण त्यांना राजस्थानला पाठविण्याबाबत कोणताच तोडगा निघाला नाही. मात्र कामगारांना भाताचे वावडे असल्याने जेवणाच्या ताटात चपाती भाजीची सोय महापालिका प्रशासनाने केली असून चपाती-भाजी खा… पण बेळगावातच रहा अशी सूचना प्रशासनाने परप्रांतीय कामगारांना केली
कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बेंगळूरमधील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे बेंगळूरमध्ये विविध कामासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांची मोठी गोची झाली होती. पोटापाण्यासह राहण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कामगारांनी गावाकडे जाण्याचा मार्ग स्विकारला होता. याकरिता सहा ट्रकमधून 350 कामगार राजस्थानकडे निघाले होते. मात्र बेळगाव हद्दीत त्यांना पकडून समाजकल्याण खात्याच्या वसतीगृहासह वंटमुरी व हुक्केरी येथे बंदिस्त ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांना जेवणसह आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पण सुविधा नको केवळ आमच्या गावाला पाठवा अशी मागणी केली होती.
याबाबत जिल्हा प्रशासनाने विचार विनिमय चालविला होता. पण सध्या कोरोना विषाणुचा प्रसार मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्याबाबत कोणताच तोडगा निघाला नाही. सध्या त्यांना बेळगावातच बंदिस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची दररोज आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या नाष्टय़ाची आणि जेवणाची व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. दुपारी आणि रात्री जेवणासाठी पुलाव दिला जातो. पण भात आम्ही खात नाही. आम्हाला चपाती-भाजी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कामगारांनी केली होती. त्यामुळे वसतीगृहाच्या आवारातच जेवण बनविण्यात येत असून त्यांच्या मागणीनुसार त्यांना चपाती-भाजी तयार करून देण्यात येत आहे. चपाती-भाजी खा… पण बेळगावातच रहा, अशी सूचना प्रशासनाने परप्रांतीय कामगारांना केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









