घरातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देत 40 हजारांहून अधिक ऐवज लांबविला
प्रतिनिधी/ बेळगाव
अंधाराचा फायदा घेत सात दरोडेखोरांनी राणी चन्नम्मानगर सेकंड स्टेज येथील अर्जुन कॉलनीमधील घरात शिरून 40 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल झाली असून या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
अर्जुन कॉलनी येथे राहणाऱया प्रकाश काशिराम नाडगौडा यांच्या घरी हा थरारक दरोडा घातला आहे. शुक्रवारी रात्री सर्वजण झोपी गेले असता मध्यरात्री 3 ते 5 वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत चार दरोडेखोर घरात शिरले. तर तिघे घराबाहेर थांबले. यावेळी प्रकाश व त्यांची पत्नी वेगवेगळय़ा खोलीत झोपी गेले होते. यावेळी दरोडेखोरांनी प्रकाश यांच्या पत्नीच्या खोलीत प्रवेश केला. या आवाजाने प्रकाश यांच्या पत्नीला जाग आली. यावेळी दरोडेखोरांनी पत्नीचे तेंड दाबले, त्या आवाजाने प्रकाश यांनाही जाग आली. त्यांनी तातडीने पत्नीच्या खोलीकडे धाव घेतली. यावेळी प्रकाश व दरोडेखोर यांच्यात झटापट झाली. त्यानंतर दोघा दरोडेखोरांना प्रकाश यांनी धरण्याचा प्रयत्न केला व आरडाओरडही केली. यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्यावर लाकडी पट्टी उगारली. आरडाओरड करू नकोस नाहीतर जीवे मारू, अशी धमकी दिली. तरीदेखील प्रकाश यांनी धाडसाने त्यांच्याशी सामना केला. यावेळी दरोडेखोरांनी मोबाईलच्या बॅटरीद्वारे घरातील सोन्याचे दागिने आणि रोख 5 हजार 500 रुपये असा 40 हजाराचा मुद्देमाल लांबविला आहे.
या घटनेनंतर उद्यमबाग पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून सर्वजण घरात असतानाच चोरटय़ांनी हा दरोडा घातला आहे.