आमदार रवी नाईक यांची मागणी
प्रतिनिधी /फोंडा
राज्यात सध्या कोरोना महामारीचे संक्रमण आटोक्यात असल्याने सरकारने चतुर्थीनंतर राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा विचार करावा. महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच अन्य राज्यांनी, जेथे कोरोनास्थिती नियंत्रणात आहे, तेथील महाविद्यालयांचे वर्ग ऑफलाईन सुरु केले आहेत. राज्य सरकारने महाविद्यालयांसाठी एसओपी लागू करुन ऑफलाईन वर्ग सुरु करण्याची मागणी फोंडय़ाचे आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी केली आहे.
फोंडा येथील पीईएस शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असलेले आमदार रवी नाईक फोंडा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील ग्रामीण भागात व काही शहरी भागांमध्येही सध्या मोबाईल नेटवर्कची समस्या कायम आहे. त्याचा परिणाम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर होत आहे. मागील दोन शैक्षणिक वर्षे विद्यार्थी घरी राहून कंटाळले आहेत. बहुतेक शिक्षक व प्राध्यापकांनी तसेच विद्यार्थ्यांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली आहे. सामाजिक अंतर, मास्कचा वापर व अन्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन चतुर्थीनंतर महाविद्यालयांचे वर्ग ऑफलाईन सुरु करणे शक्य आहे. सरकारने तातडीने त्यासंबंधी निर्णय घेण्याची गरज रवी नाईक यांनी व्यक्त केली आहे
राज्यात आजपासून गणेश चतुर्थीचा सण सुरु होत असल्याने मोठय़ा कुटुंबात गणपतीसाठी एकत्र येणाऱया लोकांनी चतुर्थीचा आनंद लुटताना, खबरदारीही घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. ज्या लोकांनी अद्याप कोरोनाची लस घेतलेली नाही, त्यांनी ती तात्काळ घ्यावी असे आवाहनही आमदार रवी नाईक यांनी केले आहे.









