सेन्सेक्स 95 अंकांनी वधारला : निफ्टी 11,247.55 वर बंद
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ात तेजी घसरणीचा प्रवास शेअर बाजाराच्या कामगिरीत पहावयास मिळत आहे. यामध्ये तिसऱया दिवशी बुधवारी जागतिक पातळीवरील मिळत्याजुळत्या संकेतामुळे एचडीएफसी, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी समभागांमुळे सेन्सेक्स तेजीसह बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या जोरावर बुधवारी दिवसअखेर सेन्सेक्स चढउताराचा प्रवास करीत अखेर 94.71 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,067.93 वर बंद झाला आहे. तसेच दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 25.15 अंकांच्या तेजीसोबत 11,247.55 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे.
सकाळी सुरूवातीच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी वधारत कामगिरी नोंदवत होते. बाजार 200 अंकांसह तेजी दर्शवत होता. हा असाच ट्रेंड राहील असं वाटलं आणि अल्पशा तेजीसह दिवसअखेर बाजार बंद झाले. युरोपीय बाजाराची सुरूवात मात्र घसरणीने झाली. दिग्गज कंपन्यांमध्ये बुधवारी टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्मयांनी वधारले आहेत. सोबत टायटन, नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, एशियन पेन्ट्स आणि एचडीएफसीचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, टाटा स्टील, इंडसइंड बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि सन फार्माचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
जागतिक पातळीवरील होत असणाऱया घडामोडींमध्ये प्रामुख्याने अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात मिळतेजुळते वातावरण निर्माण होत असल्याचा लाभ तिसऱया सत्रात देशातील शेअर बाजाराला झाल्याचे पहावयास मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क बेंट क्रूड 1.23 टक्क्मयांच्या घसरणीसह 41.05 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. दुसऱया बाजूला विदेशी मुद्रा बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वधारुन 73.76 वर बंद झाला. मंगळवारी अंशत: घसरण होऊन बाजार बंद झाला होता. शुक्रवारी 2 ऑक्टोबरला बाजार बंद असणार आहे.









