निफ्टी घसरणीसह 17 हजारावर- एचडीएफसी बँक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चढउताराच्या प्रवासात भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारच्या सत्रात 78 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणासंदर्भात घोषणा करण्याच्या अगोदरच गुंतवणूकदार सावध राहिल्याचे दिसून आले. बुधवारी एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
बीएसई सेन्सेक्स 77.94 अंक अर्थात 0.13 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 58,927.33 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 15.35 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,546.65 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक एक टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग प्रभावीत झाले आहेत. दुसऱया बाजूला टेक महिंद्रा, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एचसीएल टेक आणि बजाज ऑटो यांचे समभाग लाभात राहिले आहेत.
बुधवारी फेडरल रिझर्व्ह बँकेची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकी अगोदरच बाजारातील गुंतवणूकदार सावध झाले होते, कारण सदर बैठकीमधील निर्णयाची घोषणा बुधवारी रात्री होणार असल्याने बाजारात नकारात्मक वातावरण राहिले होते. जागतिक बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारात शांघायमध्ये तेजी राहिली असून टोकीओ बाजार नुकसानीत राहिला तसेच हाँगकाँग आणि सियोल बाजारात काहीसा दबाव होता तर युरोपियनमधील प्रमुख बाजार दुपारपर्यंत तेजीत राहिला होता.
अन्य क्षेत्रातील स्थिती
प्रमुख क्षेत्रांपैकी वाहन, आयटी आणि रियल्टी यांचे समभाग तेजीत राहिले असून यामध्ये झी एन्टरटेनमेंटच्या सोनी पिक्चर्समध्ये विलगीकरणाच्या बातमीने निफ्टी मीडियाचा निर्देशांक तब्बल 15 टक्क्यांनी अधिक वधारल्याचे दिसले.








