साहित्य : 1 मध्यम आकाराची भोपळी मिरची उभे काप करून, 1 मध्यम आकाराचे गाजर, पातळ चकत्या करून, 100 ग्राम पनीर चे मोठे तुकडे करून, 4 ते 5 बेबी कॉर्न तिरके जाडसर काप करून, 1 कांदा मोठे तुकडे करून, 2 काडय़ा कांदापात बारीक चिरुन, तळण्यासाठी तेल, 1 चमचा तेल सॉस बनविण्यासाठी, 2 चमचे लसूण पेस्ट, 1 चमचा आलं पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 1 कांदा बारीक चिरून, 1 चमचा टोमॅटो केचप, अर्धा चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, पाव वाटी पाणी, अर्धा चमचा व्हिनेगर, 1 चमचा कॉर्न फ्लोअर, पाव चमचा काळी मिरपूड, चवीपुरते मीठ, पिठासाठीः 4 चमचे मैदा, 6 चमचे कॉर्नफ्लोअर, 1 चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा मीठ, चिमूटभर खाण्याचा लाल रंग (किंवा गरजेनुसार), चिमूटभर मिरपूड
कृतीः पिठासाठी दिलेले साहित्य मैदा, कॉर्नफ्लोअर, लसूण पेस्ट, मीठ, खाण्याचा लाल रंग आणि मिरपूड एका भांडय़ात घ्यावे. त्यात थोडेसे पाणी घालून मिश्रण घट्टसर बनवून घ्यावे. नंतर यात भोपळी मिरची, गाजर, कांदा आणि बेबीकॉर्न यांचे तुकडे घालून मिश्रण मिक्स करावे. थोडय़ा वेळाने भाज्या गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात. उरलेल्या मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवून तेही तळून घ्यावेत. पुन्हा कढईत चमचाभर तेल गरम करावे. त्यात आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि मीठ घालावे. कांदा नीट परतवावा. नंतर टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, आणि पाव वाटी पाणी घालून मिश्रण ढवळावे. लागल्यास थोडे मीठ घालावे. लहान वाटीत दोन चमचे पाणी आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून मिक्स करावे. कढईत घालून थोडे घट्टसर होवू द्यावे. त्यात व्हिनेगर घालावे. आता यात तळलेल्या भाज्या आणि पनीर घालून पंधरा ते वीस सेकंदच मिक्स करावे. वरून थोडी मिरपूड आणि चिरलेली कांद्याची पात घालून स्टार्टर खाण्यास द्यावे.









