14 महिन्यांच्या परिश्रमानंतर निळ्या रंगाचे टर्फ बसण्याचे काम पूर्ण, टोकियो ऑलिंपिकच्या धर्तीवर निर्मितग्नी
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापुरात अत्याधुनिक ऍस्ट्रोटर्फचे हॉकी मैदान तयार करुन हॉकी टॅलेंटसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे द्वार खुले करण्याचे तब्बल 21 वर्षापूर्वी जाणत्या हॉकीप्रेमींनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. गेली 14 महिने परिश्रमातून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ऍस्ट्रोटर्फ बसवण्याचे काम पूर्णत्वाला गेले आहे. टोकियो ऑलिंपिकमधील हॉकी स्पर्धेसाठी मैदानांवर ज्या मानांकनाचे ऍस्ट्रोटर्फ बसवले होते, त्या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी या मानांकनाचे वॉटरबेस ऍस्ट्रोटर्फ बसवले आहे. निळ्या रंगाच्या या ऍस्ट्रोटर्फमुळे स्टेडियमला आता खऱया अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा लूक आला आहे.
शहरात 2000 साली उभारलेल्या हॉकी स्टेडियमला मेजर ध्यानचंद यांचे नाव देऊन आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. पुढील काहीच वर्षांनी स्टेडियममध्ये ऍस्ट्रोटर्फ बसवण्याच्या मागणीने जोर धरला. माजी नगरसेवक विजय साळोखे-सरदार यांच्यासह लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे ऍस्ट्रोटर्फसाठी पाठपुरावा सुरु केला. स्टेडियममध्ये ऍस्ट्रोटर्फ का आवश्यक आहे, हेही सरकारला पटवून सांगण्यास सुरुवात केली. तब्बल 16 वर्षे ही सारी कसरत सुरु होती. अखेर 16 वर्षांनी का होईना पण सरकारने मनावर घेऊन ‘खेलो इंडिया योजने’द्वारे ऍस्ट्रोटर्फ मंजूर केले. साडे पाच कोटींची निधीही मंजूर केला. महापालिकेने काढलेल्या टेंडरनुसार फेब्रुवारी 2021 मध्ये ऍडव्हॉन्स स्पोर्टस् टेक्नॉलॉजी एलएलपी कंपनीने ऍस्ट्रोटर्फच्या कामाचा श्रीगणेशा केला.
गेल्या चौदा महिन्यांच्या कालावधीत टर्फ बसवण्यासाठी जो बेस करणे आवश्यक होते, तो बेस तयार केला. त्यासाठी मैदानात अडीच ते चार फुट खोदकाम करुन त्यात मोठा, बारीक दगड, मुरुम, मध्यम खडी आणि पुन्हा बारिक खडीचा थर तयार केला. दिलेल्या ऑर्डरीनुसार पाच महिन्यांपूर्वी जर्मनीहून निळ्या रंगाचे वॉटर बेस ऍस्ट्रोटर्फ स्टेडियममध्ये आले. या काळात स्टेडियममध्ये केलेल्या बेसवर 40 मिलीमीटर दगडांचा समावेश असलेल्या डांबरीकरणाचा थर केला. नंतर या थरावर 50 व 30 मिलीमीटर दगडांचा समावेश असलेल्या डांबरीकरणाचे दोन थर तयार करुन त्यावर डांबरी-स्प्रेही केला. या स्प्रेवर पोतुर्गाल, ऑस्ट्रेलियातून मागवलेल्या रबराचा थर केला. हा थर बसवण्यासाठी ऑस्ट्रेलियातून आणलेले ग्लील्यूचा (डींक) वापर केला. हे सर्व काम पूर्ण करायला 13 महिने लागले. गेल्याच महिन्यात एलएलपी कंपनीचे तज्ञ यु. के. शर्मा यांच्यासह 6 जणांच्या टिमने स्टेडियममध्ये केलेल्या रबराच्या थरावर प्रत्यक्ष वॉटर बेस ऍस्ट्रोटर्फ बसवण्याला सुरुवात केली. अगदी अलिकडेच स्टेडियममध्ये संपूर्ण टर्फ बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
पाणी फवारणीसाठी स्प्रींकलर बसणार…
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये होणाऱया सामन्यांना पाणी फवारणीसाठी स्प्रींकलर बसवले जाणार आहेत. स्प्रींकलरद्वारे पाणी फवारणी केल्याने टर्फला मऊपणा येऊन सामन्यातील चेंडूला गती येते. लवकरच महापालिकेकडून स्प्रींकलर उपलब्ध करुन ते स्टेडियममध्ये बसवले जाईल. या स्प्रींकलरमधून प्रत्येक सामन्यांसाठी 7 हजार लिटर पाणी फवारणी होईल, अशी व्यवस्था करणार आहे. सध्या पाणी साठवण्यासाठी स्टेडियममध्ये 80 हजार लिटर पाण्याचा टँक तयार केला जात आहे.
प्रशांत गायकवाड (साईट इंचार्ज ः ऍडव्हॉन्स स्पोर्टस् टेक्नॉलॉजी एलएलपी कंपनी)