16 राज्यांमध्ये 30 हजारांहून अधिक जण बेघर ः फिलिपाईन्समध्ये 208 बळी
वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
मलेशियात शुक्रवारपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरसंकट निर्माण झाले आहे. पूरामुळे रविवारी 30 हजारांहून अधिक लोकांना बेघर व्हावे लागले आहे. देशातील 16 राज्ये आणि संघीय क्षेत्रांपैकी 8 ठिकाणी पूराने धोकादायक पातळी ओलांडल्याने आगामी काळात स्थिती अधिकच बिघडण्याची भीती आहे.
मलेशियातील स्थिती बिघडली असून देशभरात नद्यांना उधाण, भूस्खलन आणि रस्त्यांवरील पाण्यात वाहने बुडाल्याचे दिसून येत आहे. तर देशातील 15 महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने पुरवठासाखळी प्रभावित होऊ लागली आहे. यातून आवश्यक सामग्रीची टंचाई निर्माण होण्याचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
राजधानी क्वालालंपूरला लागून असलेले सेलांगोर राज्य पूरामुळे सर्वाधिक प्रभावित आहे. हे मलेशियातील सर्वात श्रीमंत राज्य मानले जाते. तेथे 10 हजारांहून अधिक लोकांना स्वतःचे घर सोडून सुरक्षितस्थळी धाव घ्यावी लागली आहे. पुरात अडकून पडलेल्या लोकांना निवाराकेंद्रांपर्यंत पोहोचविण्यास मदत करण्यासाठी पोलीस, सैन्य आणि अग्निशमन विभागाच्या 65 हजारांहून अधिक कर्मचाऱयांना तैनात करण्यात आल्याचे पंतप्रधान इस्लाइल साबरी याकूब यांनी सांगितले आहे.
10 वर्षांमधील सर्वात भीषण पूर

डिसेंबरच्या महिन्यातील हा या दशकातील सर्वात भीषण पूर आहे. या पुरामुळे अनेक शहरी भाग पाण्याखाली गेले आहेत. प्रमुख महामार्ग बंद असल्याने अनेक शहरांचा अन्य शहरांसोबतचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे महामार्गावर 5 हजारांहून अधिक लोक अडकून पडले आहेत.
पोर्ट क्लैंग बंदर अन् रेल्वेसेवा बंद
मलेशियात हा पूर फिलिपाईन्समध्ये दाखल झालेल्या राय वादळामुळे आल्याचे सांगण्यात येते. वादळामुळे मलेशियातील सर्वात मोठे बंदर पोर्ट क्लैंगवर कामकाज ठप्प झाले आहे. बंदराहून क्लैंग शहराच्या दिशेने होणारी रेल्वेसेवा रोखण्यात आली आहे.
फिलिपाईन्समध्ये जीवितहानी
फिलिपाईन्समध्ये राय वादळाच्या तडाख्यामुळे जीव गमाविणाऱयांची संख्या 208 पर्यंत पोहोचली आहे. तेथे उद्ध्वस्त झालेल्या बेटांवर अन्नसामग्री पोहोचविण्याचा प्रयत्न गतिमान करण्यात आला आहे. तसेच तेथे 30 हजार लोकांना घर आणि समुद्रकिनारी निर्मित रिसॉर्ट सोडून जावे लागले आहे.









