पत्रे थेट बाजूच्या घरावर पडले : लॅपटॉप-इतर साहित्यही झाले खराब मात्र दुर्घटना टळली
वार्ताहर / किणये
रविवारी झालेल्या चक्रीवादळाच्या पावसामुळे झाडशहापूर येथील प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून पडल्यामुळे शाळेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ते पत्रे थेट बाजूच्या घरावर पडल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. त्या घरातील काही साहित्यही खराब झाले. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
रविवारी पहाटेपासूनच वादळी वाऱयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. दिवसभर चक्रीवादळ सुरू होते तसा पावसाचाही वेग होताच. या वादळामुळे शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून पडले. हे पत्रे इमारतीला लावलेल्या अँगलसह उडून थेट बाजूला असलेल्या भरमा गोरल यांच्या घरावर पडले.
गोरल यांच्या घरात त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते. अचानक घरावर काही तरी मोठे पडल्याचा आवाज आल्याने घरातील सदस्य भयभीत होऊन घराबाहेर आले. बाहेर येऊन पाहतात तर चक्क घरावरच भलेमोठे पत्रे पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी गावातील नागरिकांनी धाव घेतली. त्यानंतर नागरिकांच्या सहकार्याने गोरल यांच्या घरात जाऊन काहींनी पाहणी केली असता त्यांच्या घरातील एक लॅपटॉप पूर्णपणे खराब झाला असल्याचे दिसून
आले.
बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन सुरू झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका बेळगाव तालुक्मयालाही रविवारी बसला आहे. वादळी वाऱयाच्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी विद्युतखांबही मोडून पडले होते. त्यामुळे रविवारी बहुतांशी ग्रामीण भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता.
बेळगाव तालुक्मयाच्या तुलनेत पश्चिम भागात मोठय़ा प्रमाणात चक्रीवादळ व पाऊस झाला. रविवारी रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरूच होता.
दुसऱया घराचेही मोठे नुकसान
शाळेच्या इमातीचे पत्रे घरावर पडल्यामुळे लॅपटॉपसह गोरल यांच्या घरातील अन्य साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच शाळेच्या इमारतीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडशहापूर गावातील काही प्रमुख पंचमंडळींनी रविवारीच घटनास्थळी भेट दिली तर मच्छे गावातील माजी ग्रा. पं. सदस्य संतोष जैनोजी व इतरांनी सोमवारी सकाळी जाऊन या ठिकाणची पाहणी केली.









