तुर्त गोव्यावरील धोका टळला
प्रतिनिधी / मडगाव
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात काल संध्याकाळी जोरदार वारे वाहू लागले व समुद्राचे पाणी वाढले. समुद्राचे पाणी किनारपट्टीवर उभारण्यात येणाऱया शेक्सापर्यंत पोचले. मात्र, सद्या कोरोना व्हायरसमुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्याने शेक्स बंद असल्याने विशेष हानी झाली नाही.

जोरदार वाऱयामुळे समुद्राच्या लाटा किनारपट्टीवर येऊन धडकू लागल्या व त्यामुळे दक्षिण गोव्यात काही ठिकाणी किनारपट्टीची धुप झाली. जोरदार लाटामुळे किनारपट्टीवरील रेती पाण्याबरोबर वाहून गेल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमार देखील समुद्रात गेले नव्हते.

दक्षिण गोव्यातील कोलवा, बाणावली, माजोर्डा, सेर्नाभाटी भागात समुद्राचे पाणी वाढल्याचे आढळून आले. चक्रीवादळामुळे गोव्यात रेड अर्लटची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ मुंबई-गुजरातकडे वळले असल्याने तुर्त गोव्यावरील धोका टळला असल्याचे सांगण्यात आले आहे.









