जिल्हा परिषदेच्या 134 शाळांचा समावेश, वर्ग खोल्यांची पडझड
प्रतिनिधी/ मंडणगड
निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील शाळांच्या इमारतींना मोठा फटका बसला आहे. जिल्हा परिषदेच्या 134 शाळांचे 1 कोटी 83 लाख, तर माध्यमिक व खासगी 24 शाळांच्या इमारतीचे 1 कोटी 45 लाख असे एकूण 3 कोटी 28 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी एन. कुचेकर यांनी दिली.
यामध्ये आंबवली शाळेच्या दोन वर्गखोल्या आंब्याचे मोठे झाड कोसळल्यामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. शिवाय संपूर्ण इमारतीचे छप्पर नादुरुस्त झाले आहे. आतले शाळेचे पूर्ण छप्पर उडाले असून वडवली शाळेवर झाड पडल्याने नुकसान झाले आहे. तसेच गणेशकोंड, आंबवणे बुद्रुक, उन्हवरे, वेसवी उर्दू, बाणकोट किल्ला मराठी, वेळास, वेरळ आश्रमशाळा यांचेही नुकसान झाले आहे.
अनेक शाळांमध्ये पावसाचे पाणी वर्गखोल्यांमधून घुसून शैक्षणिक साहित्य, पुस्तके, रंगरंगोटी केलेल्या भिंती, कपाट, महत्वाचे कागद भिजून गेले आहेत. यामुळे अनेक सुशोभित केलेल्या शाळा आता भग्नावशेष कवटाळून बसल्या आहेत. डिजिटल क्लास रूमला फटका बसला असून आवारातील बागा नष्ट झाल्या आहेत.
विलगीकरणातील नागरिकांना फटका
सुदैवाने शाळा बंद असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र काही शाळांमधून चाकरमान्यांचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यांनाही या वादळाचा फटका बसला. शाळांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून ग्रामस्थांच्या मदतीने पडलेली झाडे, फांद्या तोडून परिसर मोकळा करण्यात आला आहे. मात्र काही शाळांची अवस्था खूपच गंभीर असल्याने शैक्षणिक वर्ष कसे सुरू करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.









