खराब हवामानामुळे काही विमाने उतरविली बेंगळूरमध्ये
प्रतिनिधी / बेळगाव
अरबी समुद्रात सुरू असलेल्या चक्रीवादळाचा फटका रविवारी विमानसेवेलाही बसला. बेळगावमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण तसेच पाऊस असल्याने विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. काही विमाने बेंगळूर विमानतळावर उतरविण्यात आली. यामुळे तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांना या सर्वाचा फटका बसला.
बेळगाव परिसरात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे विमानांना लॅन्डींग करताना धावपट्टी मिळण्यास समस्या येत असल्याने विमानफेऱया रद्द करण्यात आल्या. स्टार एअरने जोधपूर व इंदूर या दोन शहरांना विमानसेवा सुरू ठेवली. स्पाईस जेटची बेळगाव-मुंबई फेरी सुरू ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला. दिवसभर असणाऱया पावसाचा विमानसेवेलाही फटका बसला.
स्पाईस जेटने बेळगाव-हैद्राबाद, ट्रुजेटने बेळगाव-तिरुपती व बेळगाव-हैद्राबाद, इंडिगोने हैद्राबाद-बेळगाव या रविवारच्या फेऱया खराब हवामानामुळे रद्द केल्या. तिरुपती-बेळगाव हे विमान बेंगळूर येथील विमानतळावर उतरविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सोमवारीदेखील असेच वातावरण राहिल्यास विमानसेवेला सलग दुसऱया दिवशीही फटका बसण्याची चिन्हे आहेत.









