चिमणगावातील प्रकार उघडकीस,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई- 7 लाखाचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/ सातारा
चिमणगाव (ता. कोरेगाव) येथे चक्क सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानांमध्ये बेकायदेशीर दारुची विक्री करणाऱयावर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून त्याच्या ताब्यातील स्कार्पिओ गाडीसह गाडीतील दारुच्या बाटल्या असा एकूण 7 लाख 8 हजार 576 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना चिमणगावात उमेश एकनाथ जाधव (वय 55 रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) त्याच्या मालकीच्या रास्त भाव दुकानातच बेकायदा दारुची चोरटी विक्री होत असल्याची माहिती मिळाली. धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना कारवाईचे आदेश दिले होते.
पथकाने दि. 28 रोजी रोजी चिमणगावातील या सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकान क्र. 33 येथे जावून अचानक छापा टाकला. यावेळी दुकानामध्ये व दुकान मालकाच्या स्कार्पिओ जीप क्रमांक एम. एच. 11 बी. व्ही. 3553 मध्ये देशी-विदेशी दारुच्या बाटल्या व इतर असा एकुण 7,08,576/- रुपयांचा प्रोव्हीबिशन माल आढळून आला. त्याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार जोतीराम बर्गे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, प्रविण फडतरे, नीलेश काटकर, कॉन्स्टेबल विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम यांनी सहभाग घेतला होता.








