प्रतिनिधी/ बेळगाव
21 व्या शतकामध्ये वावरत असताना अजूनही अंधश्रद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनातून गेली नसल्याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येत असतो. शहराच्या चौकाचौकांमध्ये लिंबू, नारळ यासह इतर उताऱयाच्या वस्तू टाकण्यात येतात. सोमवारी तर चक्क जेएमएफसी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराशेजारीच एका मोठय़ा बुटीतून उतारा टाकण्यात आला होता. त्यामुळे दिवसभर हा चर्चेचा विषय झाला होता.
यापूर्वी सरकारी वकिलांच्या कार्यालयासमोर लिंबू, नारळ फेकण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे त्या कार्यालयासमोर आता कंपाऊंड बांधण्यात आले आहे. सध्या न्यायालयामध्ये वकिलांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नाही. केवळ कोविड चाचणी केलेल्या व्यक्तींनाच आत प्रवेश दिला जातो. त्यामुळे पक्षकारांना जेएमएफसी आणि मुख्य न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच थांबावे लागत आहे.
न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. पक्षकार भर उन्हातच प्रवेशद्वारासमोर थांबत आहेत. यातच सोमवारी प्रवेशद्वाराशेजारीच लिंबू, नारळ एका बुटीमध्ये भरून ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्या ठिकाणी उभे राहणेही कठीण झाले होते. न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच अशा प्रकारे करणीबाधेचा प्रकार होत असल्यामुळे वेगवेगळय़ा चर्चा रंगल्या होत्या.









