नासाकडून 4जी नेटवर्कसाठी नोकिया कंपनीला कंत्राट : 2023 पूर्वी सेवा सुरू होणार : मानवी वस्तीची योजना
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
चंद्रावर पहिले सेल्युलर नेटवर्क निर्माण करण्यासाठी नासाने नोकिया कंपनीची निवड केली आहे. चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती निर्माण करण्याची योजना नासाने आखली आहे. 2024 पर्यंत माणसांना चंद्रावर नेण्याचे आणि स्वतःच्या आर्टेमिस मोहिमेच्या अंतर्गत दीर्घकाळापर्यंत तेथे अस्तित्व नोंदविण्याचा नासाचा प्रयत्न असल्याचे नोकिया कंपनीने म्हटले आहे.
अंतराळात पहिली वायरलेस ब्रॉडबँड कम्युनिकेशन सिस्टीम 2022 च्या अखेरपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर निर्माण करण्यात येणार आहे. कंपनीने याकरता टेक्सास येथील इन्टुएटिव्ह या खासगी स्पेसक्राफ्ट डिझाइन कंपनीशी भागीदारी करण्याचा निर्णय घेतला असून ही कंपनी नोकियाची उपकरणे चंद्रावर पोहोचविणार आहे.
नेटवर्क अंतराळवीरांना आवाज आणि व्हिडिओ कम्युनिकेशन करण्याची सुविधा देणार आहे. तसेच टेलिमेट्री आणि बायोमेट्रिक डेटा एक्स्चेंज आणि रोव्हर्स तसेच अन्य रोबोटिक उपकरणांना तैनात आणि रिमोटली कंट्रोल करण्याची अनुमती देणार असल्याचे नोकियाकडून सांगण्यात आले.
अवघड स्थितीत नेटवर्क सुरू राहणार
चंद्रावर लाँचिंग आणि लँडिंगच्या प्रतिकूल स्थितीला तोंड देण्यास सक्षम ठरू शकेल अशाप्रकारे नेटवर्कचे स्वरुप राहणार आहे. ते अत्यंत कठोर आकार, वजन आणि विजेची कमतरता भरून काढण्यासाठी अत्यंत कॉम्पॅक्ट स्वरुपात चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. 5जी नेटवर्कऐवजी 4जीचा वापर करणार आहोत. 4जी नेटवर्कने मागील दशकात स्वतःची विश्वासार्हता सिद्ध केल्याचे नोकियाने म्हटले आहे.
आर्टेमिस कार्यक्रम
आर्टेमिस कार्यक्रमासह नासा 2024 पर्यंत चंद्रावर पहिली महिला उतरविणार आहे. पूर्वीच्या तुलनेत चंद्राच्या पृष्ठभागाचे अध्ययन करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येणार आहे. याकरता स्वतःच्या व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय साथीदारांसोबत नासाने भागीदारी केली आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत कधीच न पोहोचता आलेल्या तसेच न पाहिलेल्या चंद्राच्या भागांचा शोध लावला जाणार आहे.
नोकियाचे काम सुरू
नासाने चंद्रावर 4जी सेल्युलर नेटवर्क स्थापन करण्यासाठी 14.1 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 103 कोटी रुपये) नोकिया कंपनीला दिले आहेत. हा निधी नासाच्या ‘टिपिंग पॉइंट’ सिलेक्शन अंतर्गत करण्यात आलेल्या 370 दशलक्ष डॉलर्सच्या (सुमारे 2714 कोटी रुपये) कराराचा हिस्सा आहे. ही यंत्रणा चंदाच्या पृष्ठभागावर दीर्घ अंतराच्या दूरसंचाराला सहाय्यभूत ठरू शकते, तसेच त्याचा वेग वाढवू शकते असे नासाने नमूद केले आहे.
शक्तिशाली यंत्रणेची गरज
नासाला चंद्रावर वास्तव्य तसेच काम करण्यासाठी लवकरच नव्या तंत्रज्ञानांचा विकास करावा लागणार आहे. 2028 पर्यंत अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावर काम करण्यासाठी हे आवश्यक आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर दीर्घकाळ कार्यरत राहू शकणाऱया शक्तिशाली यंत्रणेची गरज असल्याचे नासाचे प्रशासक जिम ब्रिडेनस्टाइन यांनी म्हटले आहे.
नोकियाचा यापूर्वीही प्रयत्न
चंद्रावर एलटीई नेटवर्क सुरू करण्याचा प्रयत्न करण्याची नोकियाची ही पहिलीच वेळ नाही. नोकियाने 2018 मध्येही जर्मन अंतराळ कंपनी आणि व्होडाफोन युकेसोबत मिळून अपोलो 17 लँडिंगच्या स्थळावर एक एलटीई नेटवर्क लाँच करण्याची योजना आखली होती, परंतु ही मोहीम पूर्ण झाली नव्हती.









