- आगामी महापालिकेच्या निवडणुकांसाठी मनसे-भाजप युती?
ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतीय जनता पार्टीचे महाष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र त्यापूर्वी या भेटीसंदर्भात बोलताना पाटील यांनी मनसे आणि भाजपाची युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

ते म्हणाले, भाजप आणि मनसेची युती होण्याची शक्यता नाही आहे. याचे कारण म्हणजे मनसेचे इतर राज्यांबद्दलचे विचार आम्हाला मान्य नाहीत. मात्र मतभेद असले तरी एकमेकांच्या भेटीगाठी घेणे महत्वाचे असते त्यामुळे मी राज ठाकरे यांची भेट घेणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप ठाम असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातील गोंधळ सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील आज सकाळी साडेअकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. भाजप-मनसे युतीची चर्चा गेले काही दिवस होत असून पाटील व राज ठाकरे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यातील जनतेच्या अधिकारांचे रक्षण व स्वाभिमान जपताना परप्रांतीयांवर अन्यायाची मनसेची भूमिका मात्र भाजपला मान्य नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मनसेने परप्रांतीयांना विरोधाची भूमिका बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याचे संकेत पाटील यांनी यापूर्वीही दिले आहेत.








