मुंबई \ ऑनलाईन टीम
न्यायालयही भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामिनावर सुटला आहात असा धमकी वजा इसारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेताल आहे.
नवाब मलिक माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, चंद्रकांत पाटील अशा पध्दतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी. आजपर्यंत भाजपकडून यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झाले आहे. आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का, असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला. छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
ममता बँनर्जींचं कौतुक केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांना धमकीवजा इशारा दिला होता. छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी. कशाला बंगाल वैगेरे….जिथे आहात तिथा बोला ना…जामीनावर सुटला आहात, अजून निर्दोष सिद्ध झालेला नाहीत. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल,” असा इशाराच चंद्रकांत पाटलांनी दिला होता.
छगन भुजबळ यांनी काय दिले होते उत्तर ?
यावर छगन भुजबळ म्हणाले होते की, ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं. ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे. पराभव सहन करायला हवा. आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात? सीबीआय, ईडीचा राजकीय उपयोग होतो हे माहीत होतं. आता न्याय देवताही त्यांच्या हातात आहे का? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना केला होता.
Previous Articleसातारा : कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रम रद्द
Next Article जेईई मेन 2021 : चौथ्या टप्प्यातील परीक्षा स्थगित!








