ऑनलाईन टीम / मुंबई :
गोव्यात उत्पल पर्रिकर यांच्या विधानसभा उमेदवारीवरुन भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे. उत्पल यांना भाजपने अद्याप तिकीट जाहीर केले नाही. त्यामुळे उत्पल अपक्ष उभे राहिल्यास त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुम्ही निवडणूक बिनविरोध करण्याची जबाबदारी घ्या, आम्ही उत्पल यांना तिकीट देऊ असे आव्हान दिले. त्यावर चंद्रकांत पाटलांना तिकीट देण्याचे कोणतेही अधिकार नाहीत, ते केवळ बोलघेवडे आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
राऊत म्हणाले, मनोहर पर्रीकर गोव्यातील भाजपचे प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे. आजही गोव्यात भाजपा त्यांच्या नावाने ओळखली जाते मात्र, येथे त्यांच्याच मुलाची औकात काढली जात आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांना विधानसभेचे तिकीट न दिल्यास आम्ही सर्वपक्षीय त्यांना पाठिंबा देऊ. भाजपाने उत्पल पर्रिकरांना तिकीट देण्यासाठी इतका वेळ का लावला आहे? ते कोण सांगणार. जे बोलत आहेत त्यांच्या हातात असतं तर त्यांनी कधीच तिकीटासंबंधी निर्णय घेतला असता. हे फक्त बोलघेवडे आहेत. भाजपच्या अंतर्गत बाबीत आपल्याला पडायचे नाही. पण जर उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहणार असतील तर मनोहर पर्रीकरांना आदरांजली म्हणून सर्व राजकीय पक्षांनी विरोधात उमेदवार देऊ नये, एवढंच आमचं म्हणणं आहे, असेही राऊत म्हणाले.







