प्रतिनिधी / कोल्हापूर
सोशल मीडियावर गेली दोन ते तीन दिवस भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ती धादांत खोटी व गैरसमज पसरवणारी आहे. अशी पोस्ट पसरवून द्वेष निर्माण करणाऱयांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी कोल्हापूर महानगर भाजपच्या वतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी पोलीस अधीक्षक बलकवडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष विजय आगरवाल आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, प्रदेशाध्यक्ष पाटील यांची बदनामी व त्यांच्या बद्दल द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने काही नतद्रष्ट मंडळी सातत्याने काही गोष्टी निर्माण करीत आहेत. सध्या महाराष्ट्रात असणारे महाविकास आघाडीचे सरकार सर्वच स्तरावर अपयशी झाल्यामुळे राज्यात एकमेव विरोधी पक्ष असणाऱया भाजपचे ताकतवर नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर उठसूट बोलणे सुरु आहे.
चंद्रकांत पाटील यांनी गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणावर सातत्याने अंकुश लावण्याच्या प्रयत्नामुळेच महाविकास आघाडीचे नेते बिथरले आहेत. पण महाराष्ट्रातील जनता इतकी सुज्ञ आहे की, तिला आता नीट समजले आहे की, सत्तेसाठी काहीही करणारे लोक कोण आहेत. चंद्रकांतदादां सारख्या सच्च्या व प्रामाणिक नेत्यावर अशा नीच प्रवृत्तीद्वारे खोडसाळ विधान करणाऱयांवर कठोर कारवाई व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी लवकरात लवकर अशा संबंधिताचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.