पेठ वडगाव/प्रतिनिधी :
सद्यस्थितीत भाजप फक्त राजकारण करत आहे. कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी बारा वर्षे पाट्याच टाकल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून त्यांना जिल्ह्यात मते मागण्याचा अजिबात अधिकार नाही असा घणाघात पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला.
पेठ वडगाव(ता.हातकणंगले)येथे पुणे पदवीधर मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार डॉ.जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की,राज्यात महाआघाडीचे सरकार हे कुणाला संपण्यासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी अस्तित्वात आले आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण व वीज बिलाबाबत गंभीर असून याबाबत लवकरच प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही.
आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, जातीयवादी भाजपाला दूर ठेवण्यासाठी या दोन्ही निवडणूका महत्त्वाच्या आहेत. पदवीधर व शिक्षकांच्या अडचणी अरुण लाड व डॉ.जयंत आसगावकर हे प्रभावीपणे मांडू शकतात.त्यामुळे हातकणंगले तालुक्यात या दोघांना मताधिक्य देणार.
खासदार धैर्यशील माने म्हणाले,महाआघाडीच्या वतीने उत्कृष्ट काम सुरू असून करवीरनंतर हातकणंगले तालुक्यात मतदार संख्या जास्त असल्यामुळे जितका निधी जास्त तितके मताधिक्य जास्त देणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, यादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ, युवक क्रांती आघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, भगवान जाधव, मुरलीधर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे आदींची भाषणे झाली.
यावेळी हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रीय कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleमद्यधुंद ट्रकचालकाने दोघांना ठोकरले ; एक जखमी
Next Article इचलकरंजीत कॅसिनो व जुगार अड्यावर छापा









