वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात त्या पडद्यामागून समाजसेवेचे कार्य करत असतात. आपले समाजसेवेचे कार्य ते अगदी गुप्त ठेवतात. कारण त्यांना एक सेवा म्हणूनच कार्य करायचे असते. त्यांना प्रसिद्धी नकोच असते. पण समाज त्यांना फार आदर देतो. कारण अशा व्यक्ती असतील तर खरोखरच समाज सुधाण्यास वेळ लागणार नाही. कारण लोकांच्या हितासाठी चांगले-वाईट करणे आपल्याच हातात असते. म्हणून सदगुरु वामनराव पै म्हणतात ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!’.
असेच एक समाजसेवी व्यक्तिमत्त्व लाभलेले पार्वतीनगर, कंग्राळी खुर्द येथील अवलिया चंद्रकांत मारुती चव्हाण (चंदू मेत्री) यांनी समाजसेवा म्हणून एक काम हाती घेतले आहे. त्या कामाला गेली सहा-सात वर्षे झाली. त्यांची ओळख एक सेवा म्हणूनच आहे.
कंग्राळी खुर्द परिसरामध्ये कोणीही व्यक्ती मयत झाल्यास मृतात्म्याला दहन करण्यासाठी चंद्रकांत यांना फोन करताच दहनासाठी लागणारे लाकूड ते स्वतः स्मशानमध्ये पोच करून सरण स्वतः रचतात.
बेवारस मृतदेहाचे विधी स्वतः करतात. आज एखाद्याच्या दहन विधीसाठी 3500 ते 4000 रुपये लाकडांसाठी खर्च येतो. परंतु चंद्रकांत 2100 रुपयांमध्ये लाकडे पोच करून सरण रचून सेवा देतात. कंग्राळी खुर्द परिसरातील 14-15 खेडेगावात तसेच सदाशिवनगर स्मशानमध्ये त्यांचे कार्य सुरूच आहे. त्यांनी आजपर्यंत 54 मृतदेहांची दहनविधी सेवा मोफत केली आहे.
कोरोनायोद्धा म्हणून गौरविणे गरजेचे
कोरोना काळात त्यांनी रात्रीचा दिवस करून सेवा केली आहे. हे कार्य करतेवेळी एक वेळेला त्यांना असाही प्रसंग आला की कोरोना पॉझिटिव्ह मृताच्या जवळ कोणीही येत नसत. परंतु तिथे मोठी आपुलकी दाखवत स्वतःचा जीव धोक्मयात घालून त्यांनी मृतदेहावर अग्नीसंस्कार केला आहे. हे करत असताना त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली. सिव्हिल हॉस्पिटलमधून फोन आला तुम्ही सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आहात. तेव्हा तुम्ही ऍडमिट व्हा किंवा क्वॉरंटाईन करून घ्या. परंतु मनातील कार्यरुपी सेवेच्या संकल्पामुळे घरीच क्वॉरंटाईन करून घेतले. याप्रसंगी गावातील समाजसेवी युवकांनी गृहपयोगी वस्तूंचा पुरवठा केला. ओमकार पाटील, सूरज पाटील, निखिल, तुषार, दर्शन, लाटुकर अशा अनेक व्यक्तींनी मोठा धीर दिला.
सदगुरु कृपेने व केलेल्या कार्याच्या पुण्याईने मी व आमचे कुटुंब सुखरुप बरे झालो व समाजसेवी कार्य पुन्हा हाती घेतले. चव्हाण यांची लाकडाची वखार आहे. ते कोकणातून जळावू लाकूड मागवतात. इतरही त्यांचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. समाजातील गरिबांचे विवाह कार्य, धार्मिक कार्यासाठी अगदी माफक दरामध्ये लाकूड देत असतात. त्यांची आणखी एक सामाजिक तळमळ म्हणजे प्रत्येक व्यक्तीने अंधश्रद्धा, कर्मकांड या गोष्टीतून बाहेर पडून कष्टाला प्राधान्य द्यावे. काम हीच पूजा मानावी, असा मोलाचा सल्ला ते देतात.
ते पुढे म्हणतात, ‘स्मशान तेरा होसला बडा ही नेक है’ ‘तेरे यहाँ अमीर हो या गरीब सबका बिस्तर एक है’। जन्म हा आईच्या उदरातून व शेवट स्मशानातच होतो. आईचे हृदय असे आहे, आपलं बाळ लुळं पांगळं जरी असलं तरीही त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. तसेच स्मशान एक असं मंदिर आहे ते तुम्ही कोणत्या जाती-धर्माचे पाहत नाही. तुमच्या विधीला तत्पर तयार होते. एखादी व्यक्ती मृत झाली तर कुटुंबातील व्यक्तीला मंदिरात प्रवेश दिला जात नाही. परंतु स्मशानामध्ये मृत शरीराला अग्नी देऊन आत्म्याची मुक्तता केली जाते. म्हणूनच आई-वडील हेच दैवत व स्मशान हेच मंदिर आहे, अशी ही माझी सर्व सेवा सदगुरु श्री वामनराव पै चरणी अर्पण, असेही ते शेवटी म्हणाले. संपर्कासाठी फोन नं. 9731868185, 8497015275.









