वृत्तसंस्था/ गौहत्ती
येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत सोमवारी 17 वर्षाखालील वयोगटात चंदीगड आणि हरियाणा यांनी अनुक्रमे मुलांच्या आणि मुलींच्या हॉकीचे सुवर्णपदक पटकाविले.
17 वर्षाखालील वयोगटाच्या मुलांच्या विभागातील झालेल्या अंतिम सामन्यात चंदीगडने उत्तरप्रदेशचा पेनल्टी शूट आऊटमध्ये 4-2 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. 17 वर्षांखालील मुलींच्या विभागातील अंतिम सामन्यात हरियाणाने झारखंडचा 4-3 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या सामन्यात हरियाणातर्फे पिंकीने 13 व्या मिनिटाला तर झारखंडच्या दीपिका सोरेनने गोल नोंदविले. हरियाणाने 37 व्या मिनिटाला दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. दीपिका सोरेनने सामन्यातील शेवटच्या मिनिटाला गोल करून हरियाणाला निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरी साधून दिली. पेनल्टी शूट आऊटमध्ये हरियाणाने झारखंडवर 2-1 अशी मात करत या क्रीडा प्रकाराचे सुवर्णपदक मिळविले.