चंदीगडला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला असून या शहराची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 रोजी झाली होती. चंदीगड हे शहर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी आहे. क्षेत्रफळाच्या आधारावर हे देशातील 36 व्या क्रमांकाचे शहर आहे. या केंद्रशासित प्रदेशात केवळ एक लोकसभा मतदारसंघ आहे. चंदीगडच्या कुठल्याही सर्कल किंवा उद्यानात कुठलीच मूर्ती नाही. स्थापत्यतज्ञ ली कोर्बुजिए यांनीच यासंबंधी अट सरकारसमोर ठेवली होती.
सुंदर पर्वतांनजीक सरोवराच्या काठावर वसलेले हिरवाईने नटलेले चंदीगड हे भारताचे पहिले सुनियोजित शहर आहे. चंदीगडला बहुतांश लोक ‘सिटी ब्युटीफुल’ नावाने ओळखतात. एकप्रकारे हे बुद्धिजीवींचेही शहर आहे, याचमुळे याला सिटी ऑफ इंटेलेक्चुअल असेही म्हटले जाते. हडप्पा आणि मोहेजोंदाडो संस्कृतीच्या धर्तीवर वसविण्यात आलेल्या या शहरात स्वतःचे घर असावे असे अनेक लोकांचे स्वप्न आहे. महाग भूखंडामुळे बहुतांश लोकांचे हे स्वप्न केवळ स्वप्नच बनून राहते. जर तुम्ही भारतातील चंदीगडमध्ये राहत असाल तर तुम्ही युरोपमध्ये राहिल्यासारखे आहे, असे विदेशात बोलले जाते. हे शहर प्रत्येकाला खुल्या हातांनी आपलेसे करते. ‘ओपन हँड’चे चिन्ह तुम्हाला शहरात प्रवेश करण्यापूर्वी स्वागत करताना प्रत्येक दिशेने दिसून येईल. हे ‘ओपन हँड’चे चिन्ह या छोटय़ाशा शहराची ओळख आहे. शिवालिक टेकडय़ांच्या पायथ्याला वसलेल्या या शहरातील अनेक ठिकाणे मनाला मोहीत करणारी आहेत. चंदीगडला निवृत्तिवेतनधारकांचे नंदनवन असेही म्हटले जाते. मानवी विकास निर्देशांकात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड प्रथमस्थानावर आहे.

सायकलस्वारी
चंदीगड हे शहर फ्रान्सचे स्थापत्यतज्ञ ला कार्बुजिए यांनी डिझाईन केले होते. याचमुळे हे शहर स्वतःच्या विश्वप्रसिद्ध वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. हे शहर नैसर्गिक संरक्षण अन् आधुनिकीकरणाचे संयुक्त मिश्रण आहे. येथील खुले रस्ते आणि मोठमोठी सर्कल्स या शहराची ओळख आहे. रस्त्यांच्या काठावर स्वतंत्रपणे सायकल ट्रक तयार करण्यात आले आहेत. या शहराला सायकल रायडिंगच्या दृष्टीकोनातूनच वसविण्यात आले होते, असे बोलले जाते.

चंडी मातेवर आधारित नाव
चंदीगड शहराचे नाव देवी चंडी मातेच्या नावावर आहे. चंदीगडच सीमेवर पंचकुलानजीक चंडी मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. पर्यटनस्थळाच्या स्वरुपात मोठय़ा संख्येत लोक या मंदिराला भेट देत असतात. भारत-पाकिस्तान अशी फाळणी होण्यापूर्वी पंजाब प्रांताची राजधानी लाहोर शहर होती. परंतु 1947 मध्ये भारताची फाळणी झाल्यावर लाहोर शहर पाकिस्तानात गेले आणि पंजाबसाठी नव्या राजधानीची निर्मिती करावी लागली. चंदीगड शहराचा पाया 1952 मध्ये रचला गेला होता. याच्या निर्मितीत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि राज्यपाल चंद्रेश्वर प्रसाद यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. नेहरू हे चंदीगडला आधुनिक भारतातील सर्वात सुंदर शहराच्या स्वरुपात पाहू इच्छित होते. त्यांनी स्वतःचे हे स्वप्न साकार केले होते.

सुखना सरोवर
शहराची खरी ओळख असलेल्या सुखना सरोवराची निर्मिती 1958 मध्ये एका कृत्रिम सरोवराच्या स्वरुपात करण्यात आली होती. यापूर्वी तेथे सुखना चोई जलप्रवाह वाहत होता. याचेच पाणी साठवून सरोवर तयार करण्यात आला होता. हा सरोवर मासे आणि सायबेरियन बदकांसह अनेक देश-विदेशातील पक्ष्यांचे वास्तव्यस्थळ आहे. येथे स्केच आर्टिस्ट पर्यटकांची सुंदर चित्रे रेखाटताना दिसून येतात. पावसाळय़ात हे शहर अधिकच सुंदर ठरते. सुखना सरोवराच्या काठावर पावसादरम्यान शिवालिक टेकडय़ांकडे पाहत बसण्याचा अनुभव मोहक असाच आहे.

दगड, गुलाबांची नगरी
पंजाबी कवी शिवकुमार बटालवी यांनी या शहराला दगडांचे शहर अशीही उपमा दिली होती. जगप्रसिद्ध रॉक गार्डन याच शहरात असून ते घरगुती आणि औद्योगिक कचरा अन् टाकाऊ सामग्रीच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. या रॉक गार्डनची निर्मिती नेकचंद यांनी केली होती. हे ठिकाण वाहत्या झऱयांमुळे अन् झोपाळय़ांमुळे ओळखले जाते. आशियातील सर्वात मोठे गुलाब उद्यान देखील याच शहरात असून याचे नाव झाकिर हुसैन रोज गार्डन आहे. येथे गुलाबांच्या रोपांच्या हजारांहून अधिक प्रजाती आहेत. दरवर्षी व्हॅलेंटाइन डेनिमित्त येथे गुलाब महोत्सवाचे आयोजन हेते. शहरातील एक देखील हिस्सा असा नाही, जेथे छोटी-मोठी उद्याने नाहीत. रोपे-वृक्ष, उद्यानांमुळेच हे शहर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. रोज गार्डन, रॉक गार्डन, जॅपनीज गार्डन, टेरेस गार्डन, बर्ड पार्क इत्यादी अनेक ठिकाणांना भेट देण्याचा मोह आवरत नाही.

जागतिक वारसास्थळ
चंदीगडच्या कॅपिटल कॉम्प्लेक्सला युनेस्कोने 2014 मध्ये जागतिक वारसास्थळाच्या यादीत सामील केले आहे. या कॉम्प्लेक्समध्ये उच्च न्यायालय, सचिवालय, विधानसभेचे क्षेत्र सामील असून याची वास्तुकला विश्वप्रसिद्ध आहे. येथे हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांची अनेक प्रशासकीय कार्यालये आहेत. येथील ‘ओपन हँड’ स्मारक कलाकृतीचा उत्तम नमुना आहे. पोलीस सुरक्षेतच पर्यटकांना हे ठिकाण दाखविण्यात येते. चंदीगडमध्ये अनेक संग्रहालये आहेत. येथील सरकारी संग्रहालय तसेच कला दीर्घामध्ये गांधार शैलीच्या अनेक मूर्तींचा संग्रह पाहिला जाऊ शकतो. या मूर्ती बौद्धकाळाशी संबंधित आहेत. संग्रहालयात अनेक लघुचित्रे आणि अश्मयुगातील जीवाश्मही ठेवण्यात आले आहे. सेक्टर 10 मधील संग्रहालय पाहण्याजोगे आहे. सेक्टर 23 मधील आंतरराष्ट्रीय डॉल्स म्युझियममध्ये जगभरातील बाहुल्या ठेवण्यात आल्या आहेत. टागोर थिएटर साहित्य तसेच कलेच्या दृष्टीकोनातून शहरातील सर्वात चर्चेत राहणारे ठिकाण आहे. येथे दररोज जगप्रसिद्ध नाटकांचे खेळ आयोजित केले जातात.
चंदीगड शहर नेमके कुणाचे?
चंदीगड शहर कुणाचे? पंजाब का हरियाणाचे? हा प्रश्न वारंवार उपस्थित होत असतो. या मुद्दय़ावरून दोन्ही राज्ये आमने-सामने असतात. चंदीगड हे शहर आपले असल्याचा दावा दोन्ही राज्यांकडून केला जात असतो. याकरता प्रसंगी संघर्ष करण्याची तयारीही या राज्यांकडून दाखविली जात असते. 1950 मध्ये पूर्व पंजाबचे नाव बदलून पंजाब राज्य करण्यात आले होते आणि चंदीगडला या राज्याच्या राजधानीचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर 1966 मध्ये अविभाजित पंजाबला पुन्हा पंजाबी भाषा आणि हिंदी भाषिकांच्या आधारावर पंजाब अन् हरियाणा या दोन राज्यांमध्ये विभागण्यात आले होते. तर काही क्षेत्रांचा समावेश नवे पहाडी राज्य हिमाचल प्रदेशमध्ये करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांनी चंदीगडवर स्वतःची राजधानी म्हणून दावा सांगितला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाद सोडविण्यासाठी चंदीगडला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता. परंतु इंदिरा गांधी यांनी ही व्यवस्था केवळ तात्पुरती असल्याचे संकेत दिले होते. पण पंजाब आणि हरियाणा दोन्ही राज्ये स्वतःच्या मागणीवर ठाम राहिल्याने हा प्रश्न अद्याप निकालात निघालेला नाही. 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि अकाली दलाचे प्रमुख हरचंद सिंह लोंगोवाल यांच्याकडून स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारानुसार चंदीगड 1986 मध्ये पंजाबला सोपविण्यात येणार होते. परंतु काही हिंदी भाषिक शहरे म्हणजेच अबोहर आणि फाजिल्का यांचा हरियाणात समावेश करण्यात येणार होता. याचबरोबर एका राज्याला स्वतःची राजधानी निर्माण करण्यासाठी त्यावेळी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार होता. परंतु या कराराची कधीच पुष्टी होऊ शकली नव्हती, कारण लोंगोवाल यांची हत्या काही शिख कट्टरवाद्यांकडून करण्यात आली होती. हे कट्टरवादी या कराराच्या विरोधात होते. हा वाद 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत जारी होता. चंदीगड हे अंबाला जिल्हय़ाचा हिस्सा असल्याचे म्हणत हरियाणाने स्वतःचा दावा कायम ठेवला आहे.
हिमाचलचाही दावा
हरियाणा अन् पंजाबसह हिमाचल प्रदेशनेही 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या आधारावर चंदीगडवर दावा केला होता. पंजाब पुनर्रचना अधिनियम 1966 च्या आधारावर चंदीगडच्या 7.19 टक्के भूमी प्राप्त करण्याचा अधिकार हिमाचल प्रदेशला आहे. चंदीगड हे शहर आर्थिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक दृष्टय़ा महत्त्वपूर्ण आहे. हरियाणात गुरुग्राम आणि फरीदाबाद यासारखी मोठी अन् आर्थिकदृष्टय़ा संपन्न शहरे आहेत. तर पंजाबची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने हे राज्य चंदीगडवरील स्वतःची पकड मजबूत करू पाहत आहे.
– संकलन – उमाकांत कुलकर्णी









