बीजिंग : चीनचे अंतराळयान चांग ई-5 मंगळवारी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे. चीनचा सर्वात शक्तिशाली प्रक्षेपक लाँग मार्च-5 द्वारे 24 नोव्हेंबर या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. या मोहिमेद्वारे चीन चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणणार आहे. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यावर चांग-ई-5ने स्वतःच्या लँडरला त्याच्या पृष्ठभागावर पाठविले आहे.
लँडर चंद्राच्या भूमीवर खोदकाम करून माती प्राप्त करणार आहे. त्यानंतर हे नुमने असेंडरकडे जातील. असेंडर हे नमुने घेऊन चंद्राच्या पृष्ठभागावरून उड्डाण करणार असून अंतराळात फिरणाऱया स्वतःच्या मुख्य यानाशी जोडला जाणार आहे. एखादा देश चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि दगड पृथ्वीवर आणणार असल्याची ही घटना सुमारे 4 दशकांनी घडणार आहे.
चंद्रावर मोठय़ा प्रमाणात मिळणाऱया एका अनमोल खजिन्यावर चीनची नजर आहे. हेलियम-3 या धातूच्या शोधार्थ चीन चंद्रावर पोहोचला आहे. पृथ्वीवरून वेगाने संपुष्टात येणारी पारंपरिक ऊर्जासंपदा पाहता पूर्ण जग चंद्राच्या दिशेने आशेने पाहत आहे. चंद्रावर हेलियम-3 आढळल्यास सुमारे पुढील 500 वर्षांपर्यंत मानवाच्या ऊर्जा गरजा पूर्ण करता येतील. हेलियम-3 च्या उत्खननाची प्रक्रिया सुरू झाली तर सद्यकाळातील अंतराळ अर्थव्यवस्था 2040 पर्यंत 400 अब्ज डॉलर्सवरून वाढत 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे.
आण्विक संयंत्रांमध्ये हेलियम-3 च्या वापराने किरणोत्सर्गी कचरा निर्माण होणार नाही. तसेच अनेक शतकांपर्यंत पृथ्वीच्या ऊर्जा गरजा पूर्ण करता येणार आहेत. हेलियम-3 चा चंद्रावर विशाल भांडार आहे. हा भांडार 1 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत असू शकतो. या भांडाराचा केवळ एक चतुर्थांश हिस्साच पृथ्वीवर आणला जाऊ शकतो. एक टन हेलियम-3 चे मूल्य सुमारे 5 अब्ज डॉलर्स असू शकते.









