बेंगळूर : कोरोना संसर्गामुळे 2021-22 या शैक्षणिक वर्षात थेट वर्ग सुरू करण्यास विलंब होत झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने दूरदर्शनच्या चंदन वाहिनीवर 5 जुलैपासून ‘संवेद’ ई-क्लास कार्यक्रम प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री. एस. सुरेशकुमार यांनी दिली.
राज्यातील सर्व शिक्षकांनी संवेद कार्यक्रमाचे वेळापत्रक विद्यार्थी व त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवावे. त्यांच्याशी समन्वय साधून नियोजित इयत्तेतील विद्यार्थ्यांनी नियोजित कार्यक्रम पाहावा, यासाठी उपाययोजना करा. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करा, अशी सूचना शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांना दिली आहे. जर विद्यार्थ्याला दूरदर्शन पाहण्याची व्यवस्था नसेल तर संबंधित शाळेच्या शिक्षकांनी एसडीएमसी सदस्यांची मदत घेवून विद्यार्थाना दूरदर्शन पाहण्यासाठी अनुकूल करून द्यावे व स्थानिक साधनसंपत्तीचा वापर करून विद्यार्थ्यांचे अध्ययन परिणामकारी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत आणि आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत संवेद कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले आहे.









