वार्ताहर / कुदनूर
किटवाड (ता. चंदगड) येथील लघू पाटबंधारे तलाव क्रमांक २ च्या सांडव्यापासून तयार झालेल्या धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला. मूळचा चेन्नई आणि सध्या रा. बेळगाव येथील रेल्वे कर्मचारी कार्तिक पल्यानी नंदेशा (वय २७) असे मृत तरुणाचे नांव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी, चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडे कर्नाटकच्या सीमेला लागून वसलेल्या किटवाड गावालगत दोन लघू पाटबंधारे तलाव आहेत. त्यातील कालकुंद्रीकडील क्रमांक २ च्या तलावातून सांडव्याद्वारे ओव्हरफ्लो होणार्या पाण्यामुळे धबधब्याची निर्मिती झाली आहे. या धबधब्यासह परिसरातील निसर्ग सौंदर्याची भूरळ चंदगड तालुक्यासह बेळगाव, सीमाभागाला पडली आहे. यातून येथे वर्षा पर्यटनासाठी गर्दी होत आहे. रविवार असल्याने बेळगाव येथील सात ते साठ तरुण हा धबधबा पाहण्यासह स्नेहभोजन करण्यासाठी सकाळी १० च्या सुमारास दाखल झाले होते. धबधब्यासह येथील परिसर पाहिल्यानंतर धबधब्याच्या काही अंतरावर त्या तरुणांनी भोजन बनविले होते. त्यातील कार्तिक हा जेवण केल्यानंतर धबधब्याकडे गेला होता. सायंकाळी ४ च्या सुमारास तब्बल तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे तो तरुण सांडव्याच्या पाण्यात पडून वाहून गेला.
सांडव्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यातून त्या तरुणाला बाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पाऊस थाबल्यानंतर त्या तरुणांची शोधाशोध केली असता तो सांडव्याच्या पाण्यातून वाहून गेल्याचा संशय बळावला. अखेर सायंकाळी ६.३० च्या सुमारास त्याचा मृतदेह सांडव्यात आढळून आला. या घटनेची माहिती पोलीसपाटील ओमाना सुतार यांनी कोवाड पोलिसांना दिली. रात्री उशिरापर्यंत त्या तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पाऊस अधिक झाल्यामुळे पाण्याचा प्रवाहही अधिक असल्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला नाही. सकाळी पुन्हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. घटनेची नोंद अद्याप पोलिसात झालेली नाही.
मृत तरुण बेळगावच्या रेल्वे विभागातील
मृत तरुण मूळचा चेन्नई येथील असून, तो बेळगावला रेल्वे विभागात कार्यरत होता. त्याचे वास्तव्यही सध्या बेळगावातच होते. किटवाड येथील धबधब्याची माहिती मिळाल्यानंतर मित्रांसमवेत वर्षापर्यटनासाठी तो तेथे आला होता.
पर्यटकांवर बंदी घालण्याची गरज…
सध्या चंदगड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव वाढला असून, तालुक्यातील सर्वच गावामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीत किटवाड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. अधिकांश पर्यटक हे बेळगावसह परिसरातील असून, सकाळपासून संध्याकाळपर्यंत धबधबा परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू असते. याशिवाय परिसरात दारुच्या बाटल्या तसेच प्लास्टिक पिशव्यांचा खच पडलेला आहे. किमान कोरोनाच्या काळात तरी येथे येणार्या पर्यटकांवर बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.









