‘लोकमान्य’सोसायटीच्या शाखेचा सोळावा वर्धापनदिन : अथायुमार्फत आरोग्य तपासणी शिबिर
प्रतिनिधी /चंदगड
पर्यटनाच्या माध्यमातून चंदगड जगाच्या नकाशावर येईल. इथला निसर्ग पर्यटकांना मोहिनी घालणारा असून प्रती महाबळेश्वर अशी चंदगडची ओळख आहे. चंदगड तालुक्याच्या पर्यटनाला बळ देण्याचे काम लोकमान्य करेल. लोकमान्यचे संस्थापक किरण ठाकुर हे स्वतः निसर्गवेडे असून निसर्गाच्या संवर्धनात त्यांनी दिलेले योगदान अनमोल आहे, असे मनोगत ‘लोकमान्य’चे ज्येष्ठ संचालक गजानन धामणेकर यांनी व्यक्त केले. चंदगड येथील लोकमान्य सोसायटीच्या सोळाव्या वर्धापनदिन सोहळय़ात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
गजानन धामणेकर म्हणाले, किरण ठाकुर आणि चंदगडचे नाते अत्यंत जिव्हाळय़ाचे आहे. स्व. बाबुराव ठाकुर यांनी चंदगड तालुक्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याबरोबरच खेडोपाडी रस्ते केले. चंदगडच्या सरपंचपदी तर किरण ठाकुरांच्या भगिनी प्रिया प्रभू होत्या. सोळा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या लोकमान्य शाखेचे आज वटवृक्षात रुपांतर झालेले असून लोकमान्यची विश्वासार्हता दिवसेंदिवस वाढत आहे. लोकमान्यकडे ठेवींचा ओघ प्रचंड असून त्या ठेवींचे योग्य नियोजन करून ठेवीदारांना चांगले व्याज देण्याचा प्रयत्न लोकमान्यने नेहमीच केला आहे. त्यामुळेच ठेवीचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे, असेच उदंड प्रेम यापुढेही अपेक्षित आहे.
स्वागत शाखाधिकारी प्रवीण कुरतुरकर यांनी केले. प्रास्ताविक रिजनल मॅनेजर दिलीप पाटील यांनी करून लोकमान्यचा विस्तार देशभर असून साडेपाच हजार कोटींच्या ठेवी असल्याचे सांगून लोकमान्य सुरक्षितता, सर्वोत्तम परतावा आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी ठेवीचा साडेपाच हजार कोटींचा टप्पा गाठणे ही साधी गोष्ट नसून किरण ठाकुर यांच्यावरील समाजाच्या विश्वासामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले. चंदगड तालुका पर्यटनाच्या माध्यमातून भविष्यात मोठी क्रांती करू शकतो, यासाठी लोकमान्यने तालुक्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी आयुर्वेदिक सेंटर्स सुरू करावीत, असे आवाहन केले.









