राज्यात शुक्रवारी नव्याने 46 रुग्ण : बहुतेक रुग्ण मांगोरहिलमधील : पणजीतील तावेर्नचालक गायबच
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात आता कोरोना झपाटय़ाने वाढू लागल्याने व ग्रामीण भागापर्यंत हे लोण पसरल्याने संपूर्ण गोव्यातच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल शुक्रवारी नव्याने आणखी 46 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 394 एवढी झाली आहे. ग्रामीण भागात लोक स्वतः लॉकडाऊन करत आहेत. कुंभारजुवे भागात 4 रुग्ण सापडल्याने स्थानिक पंचायत व लोकांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिरेन-चिंबल हा भाग सील करण्याचा निर्णय झाला आहे घोडोमळ, मोर्ले सत्तरी येथे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
चिंबल येथे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आता आरोग्य खात्याने सर्वांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. शिरेन चिंबल या दाट लोकवस्तीच्या भागासह चिंबलमध्ये 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. या भागात सुमारे 2000 लोकसंख्या आहे. त्यामुळे शिरेन हा भाग सील करण्याची मागणी आमदार टोनी फार्नांडिस यानी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणी केल्याचे आमदार फर्नांडिस यांनी सांगितले. गुरुवारी मोठय़ा प्रमाणात लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून अद्याप अहवाल आले नाहीत.
घोडेमळ मोर्ले सत्तरी कंटेनमेंट झोन जाहीर
घोडेमळ मोर्ले सत्तरी भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे तर कासारवाडा आणि देऊळवाडा भाग बफर झोन म्हणून जाहीर केला जाणार आहे. या भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 वर पोहोचल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक ती काळजी घेऊन या भागात कडधान्य व अन्य साहित्य पुरविले जाणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले आहे.
केरी, कुळे, मोले व उसगाव भागात लोकांनी लॉकडाऊन केले आहे. आता लोकांमध्ये दहशत वाढू लागल्याने लोक स्वतः लॉकडाऊन करण्यासाठी पुढे येत आहे.
शुक्रवारी आणखी 46 रुग्णांची नोंद
काल शुक्रवारी तब्बल 46 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 394 एवढी झाली आहे. गोव्याच्या विविध भागात कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने आता ग्रामीण भागातील चिंता वाढली आहे. सत्तरी भागात रुग्ण वाढत आहेत तर दुसऱया बाजूने चिंबल भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. आता कुंभारजुवेत रुग्ण सापडले आहेत त्यामुळे उत्तर गोव्यात आता रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मांगोरहिल वास्को व परिसरात कोरोना वाढत चालला आहे.
पणजीसह तिसवाडीत चिंता वाढली
ताळगावनंतर चिंबल परिसरात व पणजीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने पणजीत चिंता वाढली आहे. पणजी महापालिका कर्मचाऱयांचीही चाचणी करण्यात आली आहे तर मार्केट परिसरातील लोकांचीही चाचणी करण्यात आली आहे. आज शनिवारी अहवाल येण्याची शक्यता आहे. पणजीतील पॉझिटिव्ह सापडलेला रुग्ण अद्यापही गायब आहे. त्याच्या संपर्कात कोण आले हेही कळायला मार्ग नाही. त्यामुळे मार्केट परिसरातील भीती कायम आहे.
गुरुवारच्या 46 पैकी बहुतेक मांगोरहीलमधील
काल गुरुवारी सापडलेल्या 46 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण हे मांगोरहिलचे आहेत. उर्वरीत अन्य भागातील आहेत. मांगोरहिलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्याचबरोबर मांगोरहीलमुळे अन्य काही भागात कोरोना पोहोचला आहे. मोर्ले व चिंबल भागातही मांगोरहिलमुळेच कोरोना पोहोचला आहे.
रुग्णांची स्थिती चांगली, मोठी लक्षणे नाहीत : मुख्यमंत्री
मोर्ले भागातील कॉलनीचा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे तर कासारवाडा व देऊळवाडा हा भाग बफर झोन म्हणून घोषित केला आहे. राज्यात पुन्हा चाळीसपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत पण सर्वांची स्थिती चांगली आहे. या रुग्णांमध्ये फार मोठी लक्षणे दिसत नाहीत. चिंबल भागातील चाचण्या सुरू आहेत. त्यांचे अहवाल आज शनिवारी येतील. ज्या भागात रुग्ण सापडले तिथे सॅनिटाईझ केले जाते व आवश्यक ती काळजी घेतली जाते. लोकांचा अन्य भागाशी संपर्क येऊ नये म्हणून कंटेनमेंट झोनची घोषणा केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

सिरीओलॉजिकल तपासणी करावी : उत्पल पर्रीकर
कोरोना रुग्णांची सिरीओलॉजिकल तपासणी करण्याची सूचना उत्पल मनोहर पर्रीकर यांनी केली आहे. त्या तपासणीतून किती कोरोना रुग्ण बरे झाले व कशामुळे झाले त्याची माहिती मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या तपासणीतून कोरोना रुग्णांची ऍन्टिबॉडी क्षमता कळणार असून लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह का मिळाले? याचेही उत्तर मिळणार आहे. कोरोना रुग्णांसाठी ऍन्टिबॉडीज महत्वाची असून त्याचे मोजमाप या तपासणीतून होऊ शकते तसेच त्याचा फायदा घेऊन सरकार योग्य ते एसओपी करू शकते, असेही पर्रीकर यांनी म्हटले आहे.

पणजी मार्केट परिसरात शुकशुकाट
पणजी मार्केट काल शुक्रवारी पूर्णपणे बंद राहिले. ते सोमवारपर्यंत बंद ठेवले जाणार असून मार्केट भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी ही उपाययोजना महापौर उदय मकडकईकर यांनी राबवली आहे. पणजी मार्केटातील सर्व दुकाने, गाळे बंद ठेवल्यामुळे तेथे शुकशुकाट होता.
पणजी मार्केटात दुकानदार तसेच ग्राहकांनी शिरू नये म्हणून मार्केटाची सर्व दारे सकाळपासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे आतमध्ये कोणालाच प्रवेश मिळाला नाही. मासळी मार्केट, चिकन, मटण दुकानेही या बंदमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. पणजी मार्केट जरी बंद असले तरी मार्केटच्या बाहेरील तसेच शहरातील इतर ठिकाणाची बहुतेक दुकाने उघडी होती. ग्राहकांनी मार्केटबाहेरील दुकानात जाऊन आपापली खरेदी केली.
मनपाच्या 40 क्यापाऱयांची तसेच चिंबलमधून येणाऱया 70 कामगारांची कोरोना चाचणी करण्याची सूचना महापौरांनी केली आहे. महापौर उदय मडकईकर यांनीही कोरोना चाचणी केली असून पणजी मार्केट व मनपा कार्यालय सॅनिटाईझ करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
मार्केट अंशतः खुले ठेवण्यास मान्यता
आंबा व इतर फळे तसेच भाजीपाला विक्रेत्यांसाठी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत पणजी मार्केट खुले करण्याचा निर्णय महापौर उदय मडकईकर यांनी घेतला असून त्याची कार्यवाही सोमवारपर्यंत होणार आहे. चिंबलच्या विक्रेत्यांना मात्र कोविड निगेटिव्ह सर्टीफिकेट आणल्यानंतरच मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
चार दिवस मार्केट बंद राहिले तर फळे-भाजी खराब होणार असल्याची तक्रार अनेक विपेत्यांनी, दुकानदारांनी महापौराकडे केली व सूट देण्याची मागणी केली. त्याची दखल घेवून महापौरांनी संबंधित, विक्रेते, दुकानदार यांची बैठक घेतली आणि चर्चा केली व सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत मार्केट खुले करण्याचा निर्णय घेतला असे मडकईकर यांनी सांगितले.









