प्रतिनिधी / इचलकरंजी :
घोडावत ग्रुपचे सर्वेसर्वा संजय घोडावत यांच्याकडे `पाच कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या खंडणी बहाद्दराला हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अतुल निकम व प्रकाश लाड यांनी मुंबई येथे एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेतले. संशयित आरोपीचे नांव रमेशकुमार प्रतापजी ठक्कर (रा. मुंबई) असे आहे. तर त्याचा साथीदार व्हि.पी. सिंग (रा. दिल्ली) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास पो. नि. के . एन्. पाटील करीत आहेत .
याबाबत अधिक माहिती अशी की , उद्योगपती संजय घोडावत यांना व्हाट्सअप् मेसेज व कॉलिंग करून घोडावत ग्रुपवर डी. आर. आय व जीएसटी रेड करून पाच कोटी रुपयांची खंडणी द्या. अशी मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. चर्चेदरम्यान पाच कोटीच्या खंडणीमध्ये तडजोड होऊन पहिल्या हप्ता वीस लाख रुपयाचा देण्याचे ठरले. त्यानंतर संजय घोडावत यांनी हातकणंगले पोलिसात २४ जून रोजी रितसर तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम व प्रकाश लाड यांची नियुक्ती करून त्यांच्या सोबत दोन पंच व घोडावत यांचे तीन प्रतिनिधी हे पहिला वीस लाखाचा हप्ता देण्यासाठी मुंबईला रवाना झाले.
पथक मुंबई येथे गेल्यानंतर संशयित आरोपी ठक्कर याच्यावर दोन दिवस नजर ठेवून छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हॉटेल लॉर्ज येथे सापळा रचून घोडावत यांच्या प्रतिनिधीमार्फत पाकीटातुन पहिला वीस लाख रुपयांच्या हप्त्याऐवजी एक लाखाचे पाकीट देण्यात आले व ते एक लाखाचे पाकीट घेताना संशयित आरोपी रमेशकुमार ठक्कर याला मोठ्या शिताफीने पोलीस कॉन्स्टेबल निकम व लाड यांनी झडप घालून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी ठक्कर यास हातकणंगले पोलिस ठाण्यात आणुन त्याला इचलकरंजी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर संशयित आरोपीस एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.









