कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांची माहिती : वाईल्ड लाईफच्या ‘त्या’ 21 मुद्यांचेही दिले स्पष्टीकरण : नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डाच्या : ग्रीन सिग्नलनंतरच अंदाजपत्रक
दिगंबर वालावलकर / कणकवली:
अनेक अडथळ्य़ांची शर्यत पार करत गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या घोटगे – सोनवडे घाटरस्त्याचा अंतिम प्रकल्प अहवाल कंन्सल्टंन्सिंग एजन्सी असलेल्या मोनार्च कंपनीने तयार केला आहे. एक-एक करत या घाटरस्त्याचे कागदोपत्री काम पुढे सरकत असताना प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार, याकडेच कोल्हापूरसह सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. वन्यजीव विभागाच्या सूचनेनुसार हा नव्याने अहवाल तयार करण्यात आला आहे. याबाबत वन्यजीव विभागाने सूचविलेल्या 21 मुद्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डाकडून ग्रीन सिग्नलनंतरच घाटरस्त्याच्या अंदाजपत्रक व निविदा प्रक्रियेच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
या घाटरस्त्याला सुरुवातीपासूनच वन विभागाच्या परवानगीच्या ससेमिऱयाला सामोरे जावे लागले. वन्यजीव विभाग राज्य समितीने घाटरस्त्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. या घाटरस्त्याच्या कामात तीनपैकी पहिल्या स्टेजमध्ये वन विभागाची ना हरकत मिळविणे गरजेचे होते. ती मिळाल्यानंतर राज्य वन्यजीव विभागाच्या क्लिअरन्सची गरज होती. या मान्यतेचा टप्पा पार करून घाटरस्त्याच्या प्रशासकीय कामातील दोन स्टेजची पूर्तता झाली. मात्र, अद्याप तिसऱया स्टेजची परवानगी बाकी आहे. नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डाकडून काम सुरू करण्यास क्लिअरन्स देण्यात आल्यानंतर या कामाचा महत्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.
नॅशनल वाईल्ड लाईफकडून प्रतीक्षा!
वाईल्ड लाईफच्या द्विसदस्यीय पथकाकडून या घाटरस्त्याची 2016 मध्ये पाहणी करण्यात आली होती. नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डाकडे 4 कोटी 20 लाख रुपये भरायला सांगितले, ते भरण्यात आले. वन्यजीवांबाबत ज्या 21 मुद्यांचे स्पष्टीकरण मागविण्यात आले होते, त्याचेही सा. बां. विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. वन्यजीवांच्या सुरक्षा व संरक्षणाबाबत काय काळजी घेण्यात आली, सरपटणाऱया प्राण्यांसाठी काय उपाययोजना केल्या, सहय़ाद्री पट्टय़ात आढळणाऱया सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या संरक्षणाबाबत सर्व मुद्यांचे स्पष्टीकरण वाईल्ड लाईफला देण्यात आले आहे. त्यामुळे आता नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डाच्या अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वन्यजीवांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य!
या घाटरस्त्यात एकूण 25.76 हेक्टर जमीन येत आहे. त्यात राधानगरी अभयारण्याच्या 2.75 किमी हद्दीतून हा घाटरस्ता जातो. यातील सिंधुदुर्गमध्ये 17.26 हेक्टर, तर कोल्हापूर हद्दीत 8.50 हेक्टर जमीन येते. त्यामुळे वनविभाग वगळून इतर ठिकाणी काम करण्यास सा. बां. विभागाला मोठय़ा अडचणी नाहीत. मात्र, वन विभागाच्या जागेमुळे वन्यजीवांच्या संरक्षणाच्यादृष्टीने अत्यंत काटेकोरपणे नियम पडताळून व वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने काळजी घेण्यात येत आहे. सिंधुदुर्गात घोटगेच्या पुढे 2 किमी अंतरापर्यंत जुना रस्ता कार्यरत आहे. तर कोल्हापूरहून शिवडावच्या पुढे या रस्त्याला जोडणारा रस्ता कार्यरत आहे.
प्रकल्प अहवाल तपासून सादर करणार!
कोल्हापूर हद्दीत 1100 मीटर लांबीचा पूल आहे. त्या पुलाच्या डिझाईनबाबत कन्सल्टंन्ट एजन्सीकडे काम सुरू आहे. तर घाटरस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी तयार करण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील कामाचे सर्वेक्षण पुणे येथील मोनार्च कंपनीकडे देण्यात आले होते. त्यांनी प्रकल्प अहवाल तपासून कोल्हापूर सा. बां. विभागाकडे सादर करायचा होता. तो अहवाल पूर्ण झाला आहे. मात्र, रत्नागिरी सा. बां. विभागाकडून तो प्रकल्प अहवाल पडताळणी करून आमच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर अंदाजपत्रक व कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘त्या’ परवानगीसाठी पाठपुरावा कारणार!
याबाबत आमदार वैभव नाईक यांनी सांगितले, या घाटरस्त्याच्या कामासाठी सुरुवातीपासूनच खासदार विनायक राऊत व मी पाठपुरावा केला. वन विभाग व वन्यजीव विभागाच्या कठीण समजल्या जाणाऱया परवानगी मिळवत घाटरस्त्यातील महत्वाचा टप्पा पार केला. मात्र, नॅशनल वन्यजीव बोर्डाकडून क्लिअरन्स मिळविण्यासाठी राऊत यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत आहे.
कोरोनामुळे कामाच्या गतीला मर्यादा!
या घाटरस्त्याची कोल्हापूर हद्दीतील साडेतीन किमी व सिंधुदुर्गात आठ किमी मिळून एकूण साडेअकरा किमी लांबी आहे. प्रकल्प अहवाल तयार असला, तरी ज्या कंन्स्लटंन्ट एजन्सी हे काम करतात. त्या एजन्सी पुणे व मुंबईच्या असल्याने कोरोनामुळे कामाच्या वेगाला मर्यादा आल्या. काही बाबींची पूर्तता करण्यासाठी कन्सल्टंन्ट एजन्सींना येथे यावेच लागते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जसा कमी होईल, तसे हे काम अजून गतीने सुरू करता येणार असल्याचे सा. बां. विभागाच्या सूत्रांनी सांगितले.









