आसामसाठी पक्षाचे संकल्पपत्र – योग्य एनआरसी लागू करणार
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी स्वतःचे घोषणापत्र सादर केले आहे. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी संकल्पपत्र प्रसारित करत आसामच्या जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. यात प्रामुख्याने गरीबी निर्मुलन, शिक्षणाभर आणि घुसखोरीमुक्त आसामचा मुद्दा सामील आहे. तसेच भाजपने राज्यात योग्यप्रकारे एनआरसी लागू करण्याचे आश्वासन दिले आहे.
भाजपने पूराची समस्या रोखण्यासाठी मिशन ब्रह्मपुत्राचे आश्वासन दिले आहे. तसेच 30 लाख कुटुंबांना अरुणोदय योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला 3 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. सर्व नामघरांना अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार असून अवैध बांधकामे हटविण्यात येतील. शासकीय शाळांमध्ये सर्व मुलांसाठी मोफत शिक्षण, विद्यार्थिनींना आठवीनंतर सायकल देण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे.
आसाममध्ये योग्यप्रकारे एनआरसी लागू करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले जाणार आहे. घुसखोरांची ओळख पटविण्यात येणार आहे. आसाममध्ये परिसीमनच्या प्रक्रियेला पुढे नेण्यात येणार असल्याचे आश्वासन सत्तारुढ पक्षाकडून देण्यात आले आहे.
आत्मनिर्भर आसामसाठी मोहीम राबविण्यात येणार असून प्रत्येक क्षेत्राला मदत करण्यात येणार असून चालना दिली जाणार आहे. आसामला सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे राज्य म्हणून ओळख मिळवून दिली जाणार आहे. 2 लाख लोकांना सरकारी क्षेत्रात नोकरी, 30 मार्च 2022 पर्यंत एक लाख लोकांना नोकरी दिली जाईल. खासगी क्षेत्रातही 8 लाख नोकऱया उपलब्ध करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या नावाने योजना चालवून स्टार्टअपशी संबंधित लोकांना चालना देण्यात येणार आहे. याच्या मदतीने 10 लाख तरुण-तरुणींना रोजगार देण्यात येईल. सर्वांना जमिनीची मालकी देत आसामच्या लोकांना मजबूत करण्यात येणार असल्याचे भाजपने नमूद केले आहे.
तीन टप्प्यात निवडणूक
आसामच्या 126 जागांसाठी 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 47 जागा आहेत. तर दुसऱया टप्प्यात 39 आणि तिसऱया टप्प्यात 40 जागांवर मतदान होणार आहे. मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे.









