पोलीस, वनविभागाची गोकाक तालुक्यात कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱया गुन्हेगारांविरोधात पोलीस, वनविभागाच्या अधिकाऱयांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. पोलीस उपनिरीक्षिका रोहिणी पाटील व त्यांच्या पथकाने मक्कळगेरी (ता. गोकाक) जवळ घुबड तस्करी करणाऱया एका युवकाला अटक केली आहे.

राचय्या इरय्या हिरेमठ (वय 43, रा. मक्कळगेरी, ता. गोकाक) असे त्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षिका रोहिणी पाटील, हवालदार एस. आर. अरीबेंची, के. डी. हिरेमठ, बी. बी. इंगळगी व त्यांच्या सहकाऱयांनी शुक्रवारी ही कारवाई केली. मक्कळगेरीजवळ घटप्रभा डाव्या कालव्यानजीक राचय्याला अटक करण्यात आली.
घुबडाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीस वनविभागाच्या अधिकाऱयांनी सापळा रचून राचय्याला अटक केली. त्याच्याकडून दीड किलो वजनाचा एक घुबड व टीव्हीएस स्टारसिटी मोटारसायकल जप्त केली आहे. वन्यजीवी संरक्षण कायदा 1972 च्या कलम 9, 39, 44, 51 अन्वये त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून गोकाक येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱयांसमोर त्याला हजर करण्यात आले.









