प्रतिनिधी / बेळगाव
सत्ता आणि लालसा माणसाला कोणत्याही थरापर्यंत नेऊ शकते याचे वास्तवदर्शी चित्रण असणाऱया ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचे दोन प्रयोग रविवारी बेळगावमध्ये झाले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थने निधी संकलनासाठी या प्रयोगाचे आयोजन केले होते. जेएनएमसीच्या डॉ. राजशेखर सभागृहात हे प्रयोग झाले.
प्रयोगाच्या प्रारंभी रोटरीचे प्रांतपाल डॉ. गिरीश मासूरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच सर्व कलाकारांतर्फे प्रमुख भूमिका करणारे माधव अभ्यंकर यांचा आणि प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. गिरीश मासूरकर यांनी रोटरीला शुभेच्छा दिल्या. रोटरीचे अध्यक्ष सुरेश यांनी स्वागत केले. इव्हेंट चेअरमन प्रकाश पाटील यांनी प्रयोगाचा हेतू सांगून सदर निधी हॅप्पी स्कूलसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. दुर्गेश हरिटे यांनी आभार मानले.
याप्रसंगी व्यासपीठावर संध्या मासूरकर, महाराष्ट्र चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी, नियोजित प्रांतपाल बबन देशपांडे, सचिव एस. जी. पाटील, शरद पै, रेखा अभ्यंकर आदी उपस्थित होते. पेशवाईच्या पार्श्वभूमीवरील राजकारणावर हे नाटक भाष्य करते. विजय तेंडुलकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन विजय गोविंद यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन कृष्णदेव मुळगुंद यांचे आहे. संगीत पंडित भास्कर चंदावरकर यांचे असून निर्मिती मेघराज राजे भोसले यांची आहे.
नाटकात माधव अभ्यंकर आणि प्रकाश धोत्रे यांनी प्रमुख भूमिका बजाविल्या आहेत.