घर से निकलतेही, कुछ दूर चलतेही
रस्ते में है उसका घर
कल सुबह देखा तो बाल बनाती वह
खिडकी में आयी नजर…
मी शाळकरी वयात असताना रिलीज झालेलं हे गाणं मला फार आवडायचं. तेव्हा टीव्हीवर अशी गाणी बघायला मिळण्याची शक्मयता जरा कमीच असे. ‘पे चॅनल’ नामक प्रकार सुरू होण्याचा तो सुरवातीचा काळ होता. त्यामुळे हे गाणं येत्या जात्या ट्रक्टर आणि ट्रकवरच जास्त ऐकायला मिळायचं. कदाचित ‘घर से निकलतेही’ त्यांना घरची आठवण येत असेल आणि म्हणूनच ते हे गाणं लावत असणार अशी आमची त्यावेळी नक्की आणि पक्की समजूत होती. त्यात कुणा तरुणीचं वर्णन आहे वगैरे गोष्टी आम्हाला कळतच नव्हत्या. मग स्वतः शिक्षणासाठी घर सोडल्यावर घराची आठवण येऊन फार फार त्रास व्हायचा. विशेषतः मुलींनी शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहणं म्हणजे बिननवऱयाच्या सासरी रहाण्यासारखं आहे असं ज्ये÷ हॉस्टेलियन्सचं मत होतं. तेव्हा जर अशी घर या विषयावर असलेली गाणी कानावर पडली की आपोआप रडायला यायचं. खेडय़ातून आलेल्या मुलींना तर हे जास्तच फील व्हायचं.
आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरू
खेडय़ामधले घर कौलारू घर कौलारू
वगैरे गाणी म्हणजे अश्रूंचा पूर आणणारी! माजघरातल्या मिणमिणत्या उजेडात देवाला दिवा लावणारी आई, तिथेच जपमाळेचे मणी ओढत बसलेली आजी, कर्रकर्र चपला वाजवत येणारे आजोबा, झोपाळय़ावर बसून मंद झोके घेणारे वडील हे सगळं डोळय़ांसमोर एकदम उभं राहिल्यावर दुसरं काय होणार? घर सोडून निघाल्यावरही मनात जपलेलं घर सोबत घेऊनच आपण जगभर फिरत असतो. कुठेही गेलो तरी ते घर आपल्याला सावली पुरवत असतं. अगदी परदेशी राहणाऱया लोकांनाही सणासुदीच्या दिवशी आपल्या मायभूमीत वसलेल्या घराची फार आठवण येते.
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात
सी. रामचंद्र यांनी कुसुमाग्रजांच्या या गीताला संगीतही दिलंय. जगातल्या सर्वात श्रीमंत शहरांमध्ये राहूनही आणि सर्व प्रकारच्या सुखसोयी यथेच्छ उपभोगूनही ‘लाल माती निळे पाणी हिरवं शिवार’ हेच आपल्या मनाला सर्वोच्च सुख देतं. ‘घर’ या विषयावर लिहायची, बोलायची आणि गायची ऊर्मी मनुष्याला जबरदस्त असते. याच ऊर्मीतून ‘घर’ या विषयावरची कितीतरी गाणी लोकप्रिय झालेली आहेत. जगजीत सिंग, चित्रा सिंग जोडीचं
ये तेरा घर ये मेरा घर
किसी को देखना है गर
तो पहले आके माँग ले
मेरी नजर तेरी नजर
हे अतिशय प्रसिद्ध गाणं केवळ त्या सिनेमा किंवा अल्बमपुरतं राहिलेलं नसून नवीन गृहप्रवेश करणाऱया प्रत्येक जोडप्याचं स्वप्न बनून राहिलं आहे. आपलं स्वतःचं घर घेणे ही प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. पण जेव्हा ते घरी होतं आणि त्या नव्या घरात आपलं पहिलं पाऊल पडतं तेव्हाचा आनंद हा खरोखरच अवर्णनीय असतो. आणि यातून लहान मुलंही वगळली गेली नाहियेत बरं का! नाहीतर
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
सारखं गाणं का बरं घडलं असतं? मग बालसृष्टीला आवडावं म्हणून त्यात गोल गोल लेमनच्या खिडक्मया असतात, टॉफीचं दार असतं. बिस्किटांच्या गच्चीवर मोर असतो. पण शेवटी ते असतं घरच! लहानग्यांच्या स्वप्नातलं.
ते माझे घर ते माझे घर
जगावेगळे असेल सुंदर
असं प्रत्येकाला आपल्या घराबद्दल वाटतं. मग त्याचं वर्णन करताना थकायला होत नाही.
नक्षिदार अती दार तयाचे
चित्र तयावर बुद्धकलेचे
चपे वेली मूर्ती मनोहर
जगावेगळे असेल सुंदर
‘पोस्टातली मुलगी’ अशा गमतीदार नावाच्या एका पिक्चरमधलं हे गाणं गायलंय आपल्या लाडक्मया आशाताईंनी. ललत रागावर आधारित असलेलं हे गाणं पहाटेच्या संधिप्रकाशात उजळत जाणाऱया घराचं मनोज्ञ चित्र उभं करतं. ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती’ असं आपण म्हणतो तेव्हा घर कसं असावं याची काही विशिष्ट प्रतिमा आपल्या नजरेसमोर असते.
पुढे असावा बागबगीचा, वेल मंडपी जाईजुईचा
आम्रतरूवर मधुमासाचा फुलावा मोहर पानोपान
असावे घरकुल अपुले छान..
पण हे घरकुल,
फुलासारखे मूल असावे, नित्य नांदणे घरी वसावे
तीर्थरूपे ओवाळावे आपुले जीवन पंचप्राण
या गोष्टींशिवाय परिपूर्ण होत नाही. घर म्हणजे भलामोठा वाडा असो किंवा चंद्रमौळी झोपडी. जिथे प्रेम आहे तिथे घराला घरपण आहे.
राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या
असं तुकडोजी महाराज म्हणाले कारण ‘येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या.’ अशी ती प्रेमरूपी कुटी आहे.
अगदी जंगलात वास्तव्यास गेलो तरी निदान तंबू ठोकावा लागतो. युरोपियन आणि अमेरिकन खेडय़ांमध्ये हौसेने ट्रीहाउसेस बांधण्याची परंपरा आहे. तर चीन या देशात चहाकुटिरं बांधण्याची प्राचीन परंपरा आहे. आपल्याकडे तर जे घर त्यातल्या सर्व सदस्यांचा पूर्ण आदर करत आदर्शवत राहतं त्याला तर ‘घर एक मंदिर’ म्हटलं जातं. ज्या नावाचा एक चित्रपटही आहे. दोन माणसं सहजीवनाच्या ज्या आदिम प्रेरणेने एकत्र येतात तेव्हा
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
घर दोघांचे असे रचू की स्वर्ग ज्यापुढे फिका पडे
या जिद्दीने उभी राहतात. तर त्याहीपुढे जाऊन ज्याला प्रेमाची बाधा झालेली आहे आणि अख्ख्या जगाला आव्हान देऊन प्रियेसाठी कुठेही म्हणजे अक्षरशः कुठेही राहायची तयारी आहे असा निधडय़ा छातीचा प्रेमवीर थेट
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये
तृणांकुराची शय्या आणिक तुझाच बाहू उशाला
या शापित आयुष्याला
असाच ‘शय्या भूमितलं दिशोपि वसनं’ म्हणत तिला हृदयाशी धरून निघतो. अगदी वनवासातले प्रभुराम वनात कुटी कशी आणि कुठे उभी करावी याच्या इतक्मया तपशीलवार सूचना लक्ष्मणरावांना देतात की पाहूनच घ्यावं! गीतरामायणातल्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणंही तसं दीर्घ आहे. गदिमांच्या कल्पकतेला सलाम!
जानकिसाठीं लतिका, कलिका तुझिया माझ्या भक्ष्य सायकां,
उभय लाभले वनांत एका पोंचलों
येथ ती शुभचि घटी
जमव सत्वरी का÷sं कणखर उटज
या स्थळीं उभवूं सुंदर
शाखापल्लव अंथरुनी वर रेखुंया चित्र ये गगनपटीं. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाला घराची ओढ असते. म्हणूनच तर ‘दयाघना का तुटले चिमणे घरटे?’ असा आर्त विकल प्रश्न विचारला जातो. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या’ अशी विनवणी केली जाते. घराचं गाणं अविरत सुरू असतं आणि गाण्यातून घर मनात वसत असतं.
-अपर्णा परांजपे-प्रभू








