ओटवणे / प्रतिनिधी:
तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शिरून घर जमिनदोस्त झालेल्या ओटवणे कापईवाडी येथील विठोबा न्हानू वरेकर यांना माजगाव येथील आदर्श प्रतिष्ठानच्यावतीने रोख दहा हजार रुपयांसह कपडे व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. गेली दोन दशके आदर्श प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समाजात कार्यरत आहे. यापूर्वीही या प्रतिष्ठानने गरजू, गरीब व निराधार व्यक्तींना मदत केलेली आहे. तसेच सामाजिक जाणिवेतून प्रतिष्ठान मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. याच उद्देशाने आदर्श प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ओटवणे येथील विठोबा वरेकर यांच्या घरी भेट देऊन त्यांना धीर दिला. तसेच यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी आदर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत कासार, उपाध्यक्ष उमेश सावंत, सचिव अरविंद रेडकर, संजय गुळेकर, तुकाराम भोगण, माजी सरपंच दत्तगुरु भोगणे, संजय सावंत, विजय सावंत, पुरुषोत्तम परब, निखिल सुर्यवंशी, यशवंत आयरेकर, मंजू देसकर, रफिक शेख आदी उपस्थित होते.









