पहिल्या सेल्फ टेस्ट किटला अमेरिकन एफडीएफची मंजुरी : 30 मिनिटात कोविड चाचणीचे निदान
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने स्वतःच्या पहिल्या सेल्फ कोविड टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. या किटच्या माध्यमातून घरातच कोरोनाची चाचणी करता येणार आहे. या किटचा चाचणी निष्कर्ष केवळ 30 मिनिटांत प्राप्त होतो.
ल्यूकिरा हेल्थकडून निर्मिती
या सिंगल युज टेस्ट किटची निर्मिती ल्यूकिरा हेल्थ या कंपनीने केली आहे. याचा वापर आपत्कालीन स्थितीत केला जाऊ शकतो. या किटच्या माध्यमातून स्वतःच्या नाकातील स्वॅबचा नमुना घेत चाचणी करता येणार असल्याचे युएसएफडीएकडून सांगण्यात आले आहे. युएसएफडीएनुसार 14 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक या किटच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी करू शकतात.
घरातच निदान करणारे पहिले किट
आतापर्यंत घरोघरी जाऊन कोविड-19 चाचणीचा नमुना घेण्याची अनुमती होती, ज्याचा अहवाल विलंबाने मिळत होता. परंतु स्वतः वापर करता येणारे आणि घरातच निदान करणारे हे पहिलेच किट असल्याची माहिती युएसएफडीएचे आयुक्त स्टीफन हान यांनी दिली आहे. या किटचा वापर रुग्णालयांमध्ये करता येणार आहे. परंतु 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांच्या चाचणीसाठी द्रावनमुना एखादा आरोग्य कर्मचारीच घेणार असल्याचे युएसएफडीएकडून सांगण्यात आले आहे.









